मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंदच

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेमार्गावरून दरडी हटवण्याचे आणि रुळांच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू होण्यासाठी प्रवाशांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. रेल्वेमार्गावरून दरडी हटवण्याचे आणि रुळांच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक गुरुवारी (ता. ८) पूर्ववत होण्याची शक्‍यता आहे.

खंडाळा घाटात मंकी हिल येथे रेल्वेमार्गावर कोसळलेल्या दरडी हटवण्याचे काम मंगळवारीही (ता. ६) सुरू होते. क्रेनच्या मदतीने दगडमातीचे ढिगारे हटवले जात असताना मंगळवारी पुन्हा दरड आणि माती कोसळल्यामुळे क्रेनही अडकली. दुसऱ्या क्रेनच्या मदतीने ही क्रेन चिखलातून बाहेर काढण्यात आली. दरडी हटवण्याचे काम बुधवारीही (ता. ७) सुरू राहील. मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक गुरुवारी पूर्ववत करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. 

मध्य रेल्वेवरील शेलू, नेरळ, वांगणी आणि टिटवाळा या स्थानकांजवळ मंगळवारीही ताशी २० किलोमीटर वेगमर्यादा घालण्यात आली होती. त्यामुळे लोकल फेऱ्यांना विलंब होत होता. आतापर्यंत १०० पेक्षा अधिक मेल-एक्‍स्प्रेस रद्द केल्याने रेल्वेला २० कोटींचा फटका बसला.

 

बदलापूर-कर्जत लोकलसेवा अखेर ४८ तासांनी सुरू

नेरळ: शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे बदलापूर-कर्जत दरम्यानची प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली होती. तब्बल ४८ तासानंतर म्हणजे मंगळवारी सकाळी उपनगरीय लोकलची सेवा सुरू करण्यात आली. दरम्यान, त्याचवेळी कर्जत-खोपोली ही बंद पडलेली उपनगरीय सेवा देखील पूर्ववत झाली. दरम्यान सोमवारी मध्य रेल्वेने कर्जत-खोपोली दरम्यान शटल सेवा सुरू केल्याने प्रवाशांना मुंबईला जाणे शक्‍य झाले होते.

महापूराच्या पाण्यामुळे मध्य रेल्वेचा नेरळ-शेलू दरम्यानची ट्रॅकखालील माती वाहून गेली होती. त्यामुळे रविवार पहाटेपासून मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा बदलापूरपासून कर्जतपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. खोपोली-कर्जत मार्गावर लौजी स्थानक भागात देखील रुळाखालील माती वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूकी बंद करण्यात आली होती.

रोहा-पनवेल रेल्वे वाहतूक पूर्वपदावर
कोलाड: दोन दिवस ठप्प असलेली मध्य रेल्वेच्या रोहा-पनवेल मार्गावरील वाहतूक मंगळवार (ता. ६) पासून पूर्वपदावर आली. यामुळे रोह्यापासून मुंबई, ठाणे व पनवेल नवी मुंबईकडे नोकरी व्यवसायासाठी दैनंदिन जाणाऱ्या चाकरमान्यांसह अन्य प्रवासीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

रविवारी आपटा-जिते दरम्यानच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे व अन्य भागात पूरसदृशस्थिती निर्माण झाल्यामुळे रविवारपासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली होती. रोहा स्थानकासह मध्य व कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर यामुळे जलद गाड्यांसह प्रवासी गाड्या तासन्‌ तास खोळंबल्या होत्या. यामुळे प्रवासीवर्गाला अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले होते. रविवार, सोमवार पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या मार्गावर कोसळलेली दरड बाजूला काढून अप व डाऊन मार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी केल्यानंतर मंगळवारी सकाळपासून पनवेल रोहा व पुढे कोकणाकडे जाणारी वाहतूक ही पूर्वपदावर आली असल्याची माहिती रोहा स्थानकाचे व्यवस्थापक सुरेश कुशवाह यांनी दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune mumbai railway service not started yet