वर्षावर आमदारांच्या बैठकीत आंबा पडला! आणि उद्धव ठाकरे म्हणाले...

स्थिर सत्तेचा लंबक मागील अडीच वर्षांपासून हेलकावे खात असताना आता मात्र राज्यसभा निवडणुकीत अस्थिरतेचा धोका महाविकास आघाडी सरकारला सतावत आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray e sakal

मुंबई : स्थिर सत्तेचा लंबक मागील अडीच वर्षांपासून हेलकावे खात असताना आता मात्र राज्यसभा निवडणुकीत अस्थिरतेचा धोका महाविकास आघाडी सरकारला सतावत आहे. महाविकास आघाडीने पाच उमेदवार मैदानात उतरवले आहेत. पण, यापैकी चार प्रमुख उमेदवारांना केवळ ४२ मतांचाच अधिकृत कोटा नको असून ‘रिस्क फॅक्टर’ वर या उमेदवारांचा भरोसा नसल्याचे चित्र आहे. यासाठी किमान दोन मते अतिरिक्त देऊन ४४ मतांचा कोटा सुरक्षित कोटा मिळावा यासाठी आघाडीतील तिन्ही पक्षात जोरदार चर्चा सुरू असल्याचे समजते. भाजपनेही अतिरिक्त मते मिळविण्यासाठी गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेत आमदारांना मार्गदर्शन केलं. यावेळी एक प्रसंग घडल्याने उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचं लक्ष्य वेधून घेतलं.

विजयासाठी ४२ मते आवश्‍यक आहे. या मतांचा पहिल्या पसंतीचा तंतोतंत कोटा आखून दिला आणि एखाद्या आमदाराकडून जराशी चूक झाली तरी मत बाद होण्याचा धोका सर्वच उमेदवारांना आहे. यामुळे शिवसेनेकडून संजय राऊत यांना सुरक्षित ४३ किंवा ४४, तर राष्ट्रवादी काँग्रेसही प्रफुल्ल पटेल यांना किमान ४४ मतांचा कोटा निश्चित करेल, असे सूतोवाच आहेत. काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी हे ‘हायकमांड’च्या मर्जीतले उमेदवार असून अल्पसंख्याक देखील आहेत. त्यामुळे काँग्रेसची हक्काची सर्व ४४ मते ही पहिल्या पसंतीने प्रतापगढी यांना मिळावीत, असा आग्रह सुरू असल्याची माहिती आहे. या अतिरिक्त मतांच्या बेगमीमुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना अपेक्षित असे ४२ मतांचे लक्ष्य गाठणे आव्हानात्मक असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, उद्या (ता. ७) महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व आमदार मुंबईत दाखल होत असून रात्री आपापल्या पक्षासोबत त्यांना रणनिती आखून समजावले जाईल, असे सांगण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उद्या शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मुलुंड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

झाडावरून आंबा पडला आणि उद्धव ठाकरे म्हणाले...

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे आमदार आणि समर्थक अपक्षांची ‘वर्षा’वर बैठक बोलाविली होती. यावेळी त्यांनी भावनिक आवाहन केले. ‘शिवसैनिकांना न्याय मिळावा यासाठी सत्ता स्थापन केली आहे. एका सच्च्या शिवसैनिकाला निवडून द्यायचे आहे. त्यामुळे एकत्र राहू या,’ असे ते म्हणाले. ही बैठक सुरु असतानाच ‘वर्षा’च्या आवारातील झाडावरून एक आंबा पडला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘हा शुभसंकेत आहे. शिवसेनेला फळ मिळाले आहे.’

आमदारांचे दबावतंत्र

राज्यसभा निवडणुकीत जोरदार राजकीय रस्सीखेच सुरू असताना अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांनी महाविकास आघाडीवर दबावाचे राजकारण सुरू केले आहे. सरकारला समर्थन असलेल्या बहुजन विकास आघाडीने अद्याप निर्णय घेतला नसला तरी स्थानिक पातळीवर ‘बविआ’चा थेट शिवसेनेशी संघर्ष आहे. त्यामुळे ‘बविआ’ची भूमिका तूर्तास तरी महाविकास आघाडीच्या बाजूने नाही. त्यातच, अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी घरचा आहेर दिला आहे. मंत्री बच्चू कडू यांनीही मतदानाचा निर्णय अखेरच्या पाच मिनिटांत घेणार असल्याचे सांगितले आहे.

मतदानाबाबत आयोगाकडे विचारणा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने अशा मतदारांचे मतदान कसे घ्यायचे, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय आयोगाला पत्र पाठवून विचारणा केली आहे. सध्या कोरोना रुग्ण वाढत असल्याने मतदानाआधी आमदारांची कोरोना चाचणी करावी लागणार का, याचीही चर्चा आहे. मतदानापर्यंत अन्य काही आमदारांनाही कोरोना होण्याची भीती आहे. त्यामुळे कोरोनाबाधित आमदारांचे मतदान कसे घ्यायचे, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com