
ग्लोबल टिचर डिसलेंचा राजीनामा नामंजूर! शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठविले पत्र
सोलापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा आज (शुक्रवारी) प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी नामंजूर केला. प्रशासकीय कारणास्तव राजीनामा मंजूर केल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु, चौकशी समित्यांच्या अहवालात प्रतिनियुक्तीच्या काळातील त्यांची गैरहजेरी उघड झाली आहे. त्यामुळे डिसलेंवर कारवाई प्रलंबित असल्याने राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डायट) डिसले गुरुजींना १७ नाव्हेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या काळासाठी प्रतिनियुक्त केले. १८ डिसेंबर २०१७ रोजी त्यांना परितेवाडी शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांनी हजर रिपोर्ट दिला, परंतु त्यावर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती. शिक्षण संचालकांनी पुन्हा डिसलेंना १ नोव्हेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०२० या काळासाठी पुन्हा त्याचठिकाणी प्रतिनियुक्ती दिली. त्या काळातही ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी त्यांची चौकशी केली. चौकशी समितीने दिलेला अहवाल परिपूर्ण नसल्याने त्यावेळी डिसलेंवर कोणतीच कारवाई झाली नाही. मात्र, ‘ग्लोबल’ झालेले वस्ती शाळेवरील डिसले गुरुजी अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत, त्यांचे कॉल घेत नाहीत, असा अनुभव अनेकांना आला. त्याच्या तक्रारी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे आल्या. त्याचवेळी फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा द्यावी म्हणून ग्लोबल टिचर प्रशासकीय चौकट सोडून थेट मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांना रजेचा अर्ज परिपूर्ण करून द्यावा, असे त्यांना सांगण्यात आले आणि ग्लोबल टिचर पुन्हा राज्यभर चर्चेत आले होते.
डिसलेंवर कारवाईची टांगती तलवार
शिंदे-फडणवीस सरकारचा वाद न्यायालयात सुरु आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सातत्याने दिल्ली दौरे सुरु असून अनेक आमदारांच्या मतदारसंघात सभा होत आहेत. त्यामुळे डिसले गुरुजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतरही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. अशा परिस्थितीत डिसले गुरुजींनी स्वत:हून राजीनामा मागे घेतला नाही. आता प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनीच तो नामंजूर केल्याने आता डिसलेंवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी जातील की नाही?
तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशाने डिसले गुरुजींना रजा द्यावी लागली होती. त्याचवेळी डिसलेंच्या ‘डायट’वरील प्रतिनियुक्तीची फेरचौकशी झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना दमछाक झालेल्या गुरुजींनी नोकरी सोडण्याचाच निर्णय घेतला. ७ जुलैला त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे राजीनामा सोपविला होता. त्यामुळे ते फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी जातील की नाही, यावर प्रश्न उपस्थित झाला. पण, त्यांना यापूर्वीच रजा मंजूर झाल्याने ते पुढील आठवड्यात अमेरिकेला जातील, असेही बोलले जात आहे
Web Title: Resignation Of Global Teacher Ranjeetsinh Disale Rejected A Letter Sent By The Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..