आता अविश्‍वास ठरावाचा दबाव? 

मृणालिनी नानिवडेकर - सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा आहे. 

मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा आहे. 

महापौरपदाच्या नऊ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत सरकारमधले सहकारी पक्ष परस्परांना मदत करणार का? असा प्रश्‍न राजकीय वर्तुळात चर्चेला असतानाच विरोधी पक्षांनी सरकारवर अविश्‍वास दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. या ठरावावेळी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जाते. कॉंग्रेसने ठराव मांडण्याची तयारी सुरू केली असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी मात्र आपल्या पक्षाचा या हालचालींशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. 

शिवसेनेने महापौरपदासाठी आवश्‍यक असणाऱ्या मतांची जुळवाजुळव पूर्ण केली आहे. भारतीय जनता पक्षाने जुने संबंध सोडून आता शिवसेनेला खुजे दाखवण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभांच्या निवडणुकीत उत्तर देण्याला आम्हाला वेळ कमी पडला, पण मुंबई महापालिकेत आम्ही ताकद दाखवली आहे. क्रमांक एकवर असलेल्या आमच्या पक्षाला चार अपक्षांचा पाठिंबा मिळाला असल्याने महापौरपद शिवसेनेलाच, असे या पक्षाच्या एका प्रमुख नेत्याने सांगितले. 

खुले मतदान 
महापौरपदाच्या निवडीसाठी सन 2007 पासून खुले मतदान होते. आयाराम-गयाराम रोखण्याबरोबरच राजकीय व्यवस्थेत पक्षादेश मानला जावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खुले मतदान होते. आपण शिवसेनेला अप्रत्यक्ष मतदान करणार नाही, हे दाखवण्यासाठी कॉंग्रेसने तिसरी आघाडी उभी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात समाजवादी पक्ष सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या लढाईत तिसऱ्या आघाडीत यावे असे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शिवसेना किंवा भाजप या दोघांनाही मतदान केल्याचा आरोप सहन करावा लागणार नाही. या स्थितीत भाजपला तिसरा उमेदवार उभा करण्याची वेळ येईल. 

मनसेशी संपर्क 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सात मते महापौरपदाच्या निवडीत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होकार दिला, तर भाजपचे काही ज्येष्ठ नेते राज ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहेत. शिवसेनेतील काही नेत्यांनीही राज यांच्याशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते.

Web Title: The resolution of no confidence under pressure