कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवर आता सेवानिवृत्त शिक्षक! शिक्षकांचे वेतन १ तारखेला होईना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School
कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवर आता सेवानिवृत्त शिक्षक! शिक्षकांचे वेतन १ तारखेला होईना

कमी पटसंख्येच्या झेडपी शाळांवर आता सेवानिवृत्त शिक्षक! शिक्षकांचे वेतन १ तारखेला होईना

सोलापूर : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा असून २१२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे शासनाच्या नियोजित धोरणानुसार त्या शाळांवर ४०० कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेले शिक्षक त्याठिकाणच्या मुलांना शिकवतील. राज्यभरासाठी हा निर्णय पुढील शैक्षणिक वर्षीपासून लागू होईल.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) प्रत्येक ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक बंधनकारक आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या पावणेतीन हजार शाळांमध्ये सव्वादोन लाख विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी नऊ हजार ५४० शिक्षक मंजूर आहेत. परंतु, त्यातील ५७३ पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत. दरम्यान, एकूण पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या पुरेशी आहे. मात्र, बऱ्याच शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली आहे. शहरी हद्दवाढ भागातील जिल्हा परिषदेच्या काही शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच खासगी शाळांशी स्पर्धा करताना जिल्हा परिषदेच्या जवळपास दोनशे शाळांची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत देखील त्या शाळांवर मोठ्या संख्येने शिक्षक कार्यरत आहेत. दुसरीकडे रिक्त पदांमुळे अनेक शाळांवर विद्यार्थी जास्त असतानाही शिक्षक अपुरे आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षे सुरु होण्यापूर्वी शिक्षक भरती होऊन पुरेसे शिक्षक मिळतील. तसेच २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर सेवानिवृत्त शिक्षक नेमले जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिक्त पदे अन्‌ कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती सादर

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मंजूर पदांपैकी ५७३ शिक्षक कमी आहेत. त्यासंबंधीची माहित नुकतीच शासनाला सादर केली आहे. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती यु-डायसवरुन शासनाला मिळाली आहे. रिक्त पदांची भरती व कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत पुढील शैक्षणिक वर्षात शासन स्तरावरून निर्णय अपेक्षित आहे.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

शिक्षकांचा १ तारेखला होईना पगार

राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांवरील शिक्षकांचा पगार दरमहा १ तारेखलाच व्हावा, असा यापूर्वीच शासन निर्णय झाला आहे. शिक्षकांचे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, गोल्ड लोन यासह अन्य कर्जाचे हप्ते वेळेत बॅंकेला देता यावेत हा त्यामागील हेतू होता. परंतु, कोरोनातून सावरूनही सरकारकडून शिक्षकांच्या वेतनासाठी पुरेसा निधी मिळत नाही. सोलापूर जिल्हा परिषदेतील नऊ हजार १०० शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा ८४ कोटी रुपये लागतात. मात्र, हा निधी दोन टप्प्यात येत असल्याने पहिल्यांदा निम्म्या शिक्षकांचा पगार १० तारखेपर्यंत तर राहिलेल्या शिक्षकांचे वेतन २५ तारखेपर्यंत होत आहे. त्यामुळे शिक्षकांना बॅंकांचा दंड भरावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.