शाळा सुरु करण्याचा मुख्याध्यापकांना अधिकार ! राज्यातील साडेपाच हजार शाळा बंदच

तात्या लांडगे
Tuesday, 15 December 2020

मुख्याध्यापकांनी परिस्थिती पाहून घ्यावा निर्णय
सोलापूर जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या एक हजार 87 पैकी एक हजार 42 शाळा सुरु झाल्या आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. उर्वरित शाळा सुरु करण्यासंदर्भात स्वतंत्र अध्यादेश काढण्याची गरज नसून शाळा सुरु करण्यासंबंधीचा अधिकार संबंधित मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आला आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

सोलापूर : राज्यातील 22 हजार 204 शाळांपैकी (नववी ते बारावीपर्यंत) आतापर्यंत 16 हजार 620 शाळा सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी आता दहा लाख 72 हजार 490 विद्यार्थी शाळांमध्ये हजेरी लावत आहेत. मात्र, दहावी- बारावीच्या परीक्षेला आता अवघे चार महिने शिल्लक असल्याने नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा अधिकार संबंधित शाळांमधील मुख्याध्यापक तथा प्राचार्यांना देण्यात आला आहे.

मुख्याध्यापकांनी परिस्थिती पाहून घ्यावा निर्णय
सोलापूर जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या एक हजार 87 पैकी एक हजार 42 शाळा सुरु झाल्या आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहेत. उर्वरित शाळा सुरु करण्यासंदर्भात स्वतंत्र अध्यादेश काढण्याची गरज नसून शाळा सुरु करण्यासंबंधीचा अधिकार संबंधित मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आला आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर

ठाणे, नाशिक, मुंबईतील एकही शाळा अद्याप सुरु झालेली नाही. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील 100 टक्‍के शाळा सुरु झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 96 टक्‍के शाळा सुरु झाल्या असून राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक विद्यार्थ्यांनी (51 टक्‍के) शाळांमध्ये उपस्थिती लावली आहे. तर गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव व परभणी जिल्ह्यातील शाळांमध्ये 30 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. पालघर, हिंगोली वगळता अन्य जिल्ह्यांमधील 50 ते 96 टक्‍के शाळा सुरु झाल्या आहेत. राज्य सरकारने बंद असलेल्या शाळांची माहिती मागविली असून शाळा बंद असल्याची कारणे संबंधित मुख्यापकांना द्यावी लागणार आहेत. तसेच नववी ते बारावीपर्यंत विशेषत: दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा किती टक्‍के अभ्यासक्रम पूर्ण झाला, याचीही माहिती संबंधित मुख्याध्यापकांना शालेय शिक्षण विभागाला डिसेंबरअखेर द्यावी लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बंद असलेल्या शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून मुख्याध्यापकच घेतील, असे शालेय शिक्षण विभागाचे संचालक डी. जी. जगताप यांनीही 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांची स्थिती

  • एकूण शाळा
  • 22,204
  • एकूण विद्यार्थी
  • 56.48 लाख
  • सध्या सुरु असलेल्या शाळा
  • 16,620
  • शाळांमधील उपस्थित विद्यार्थी
  • 10.73 लाख

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The right of the headmaster to start the school; Five and a half thousand schools in the state are closed