Maharashtra Din: कातळशिल्पांतील सौंदर्य उलगडून दाखवणारा पुरातत्वज्ञ : ऋत्विज आपटे

कोकणाला इतिहास नाही, हा आरोप पुसून टाकायला निघालेला एक तरुण म्हणजे ऋत्विज आपटे. कातळशिल्पांच्या ध्यास घेतलेल्या या तरुण पुरातत्वज्ञाबद्दल जाणून घ्यायलाच हवं.
ऋत्विज आपटे (Ritwij Apate)
ऋत्विज आपटे (Ritwij Apate)E sakal

कोकणाला इतिहास नाही, हा आरोप पुसून टाकायला निघालेला एक तरुण म्हणजे ऋत्विज आपटे. ऋत्त्विजकडे फक्त आरोप पुसून टाकण्याचा बाणा आहे, असं नव्हे तर त्यासाठी आवश्यक कृती करण्याची तडफसुद्धा आहे. कोकणात दडलेली असंख्य कातळशिल्प शोधून काढण्याच्या मोहिमेवर असलेल्या ऋत्विज आपटेबद्दल जाणून घेणं, म्हणूनच महत्त्वाचं आहे. (Ritwij Apate : the young archaeologist in search of petroglyphs in Kokan)

आचार्य अत्रे म्हणाले होते, आपल्या देशाला भूगोल आहे पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. पण महाराष्ट्राचा सगळाच इतिहास काही समोर आलेला नाही. अशा अनेक जागा आहेत, ज्या जगापासून दूर, अज्ञातवासात आहेत. खरंतर लपून राहिल्यासारख्याच आहेत.

पण इतिहासाच्या याच पाऊलखुणा शोधायचं काम करतात, पुरातत्व विभागातील अभ्यासक, शास्त्रज्ञ आणि असाच कोकणच्या इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडू पाहणारा तरुण आहे, ऋत्विज आपटे

दहावीपर्यंत पेणला शिकलेल्या ऋत्विजला तोपर्यंत पुरातत्त्व विभाग म्हणजे काय ते माहितीच नव्हतं. चांगले मार्क मिळाल्यावर मग कॉमर्समध्येच काहीतरी करायचं म्हणून तो मुंबईत आला. इथे अकरावी, बारावी करताना त्याला पुरातत्व विभाग नावाचं काहीतरी असतं असं कळलं. इतकंच नव्हे तर या ज्ञानशाखेबद्दल प्रचंड कुतुहल निर्माण झालं.

मग ऋत्विजने त्याबद्दल माहिती मिळवण्याचा सपाटा लावला. त्याची भेट झाली, मंजिरी भालेराव यांच्याशी. त्यांच्याकडून ऋत्विजला या क्षेत्राची व्याप्ती कळली आणि त्यात काम करायचं तर कॉमर्सला सोडचिठ्ठी द्यावी लागेल, याची खात्रीही पटली.

बारावीनंतर त्याने कलाशाखेत प्रवेश घेऊन आधी संस्कृतमधून पदवी घेतली मग त्याने इंडोलॉजीमध्ये डिप्लोमा केला आणि मग पदव्युत्तर पदवी मात्र आर्किऑलॉजी अर्थात पुरातत्त्वशास्त्रात घेतली.

petroglyphs @ devihasol
petroglyphs @ devihasolE sakal

कातळशिल्पांशी गाठ

ऋत्विजने पदवीनंतर पहिल्यांदा कामाला सुरुवात केली ती हम्पी येथून. पुढे महाराष्ट्र पुरातत्व संचलनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे यांच्या शिफारशीने आणि मार्गदर्शनाखाली ऋत्विज दाखल झाला रत्नागिरीत. त्यावेळी रत्नागिरीत कातळशिल्पांविषयी काम आधीच सुरु झालं होतं. भाई रिसबुड आपल्या सहकाऱ्यांसमवेत हे काम करत होते.

ऋत्विज सांगतो, पहिल्यांदा मी इथे आलो तेव्हा खरंतर मीसुद्धा क्लीयर नव्हतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि काय करू शकतो.

दुसरं म्हणजे रिसबुड आणि सहकाऱ्यांना ऋत्विजच्या कामाविषयी, त्याच्या तळमळीविषयी फारशी खात्री नव्हती. पण हळूहळू त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मग त्या सगळ्यांची एक घट्ट टीम बनली.

petroglyphs
petroglyphsE sakal

ध्यानी मनी कातळशिल्पच

ऋत्विज म्हणतो, कातळशिल्प आणि एकूणच या सगळ्याचा चस्का लागल्यावर खरोखरच धमाल यायची. कातळशिल्पांच्या सफरीवर निघण्याचा प्रवास आता आठवला तरी गंमत वाटते. सुरुवातीला लोकांना याबद्दल फारसं माहिती नव्हतं. तेव्हा आम्ही भल्या पहाटे निघायचो कारण उन्हाच्या आधी जेवढा जास्त भूभाग कव्हर होईल तेवढं बरं असायचं. गावात पोहोचायचं तिथल्या लोकांना विचारायचं त्यावरुन जी माहिती मिळेल त्यावरुन शोधार्थ निघायचं.

कोकणातल्या सड्यांवर लपलेली ही कातळशिल्प म्हणजे मोठा खजिना आहेत. अगदी अवाढव्य अशी ही कातळशिल्प आहेत. त्यात प्राणी, मानवी आकार आहेत आणि ते अगदी खरा प्राणी असावा त्या आकाराएवढे आहेत. काही चित्रं तर अगदी ५० फुटांहूनही अधिक लांबीची आहेत. त्यात आढळणारे काही प्राणी उदा. गेंडा, पाणघोडा हे तर कोकणात आढळत सुद्धा नाहीत मग त्यावेळच्या माणसाने ते कोरले तरी कसे, असा प्रश्न अभ्यासकांना पडला आहे.

कातळशिल्प कोरणारा माणूस स्थलांतरीत झालेला होता का, काही कातळशिल्पांच्या आसपास दगडी हत्यारं सापडली होती. ही हत्यारं माणसाने कशी तयार केली असतील असे अनेक प्रश्न पडतात.

ऋत्विज सांगतो, माझ्या तर स्वप्नातसुद्धा कातळशिल्प यायची. मीच त्या काळात जाऊन ती कोरत बसलोय असं काय काय वाटायचं, इतकं त्या काळाशी मी एकरुप झालो होतो.

किस्से कातळशिल्पांचे

कातळशिल्प शोधणं आता काहीसं सोपं झालं आहे कारण लोकांना त्याबद्दल माहिती होऊ लागली आहे. पण ऋत्विज सांगतो, पूर्वी आम्ही एखाद्या गावात गेलो की तिथल्या लोकांना आमच्या कामाच्या हेतूबद्दल खात्री पटवून देणं, हेच फार महत्त्वाचं होतं. अनेकदा गावकऱ्यांचा गैरसमज व्हायचा. त्यांना वाटायचं ही लोकं आपली जमीन हडप करण्यासाठी आलेली आहेत, मग ते चक्क भांडायला ठाकायचे.

  • एकदा एका कातळशिल्पाजवळ साइटचं उत्खनन सुरु होतं. तितक्यात त्या जागेचा मालक तिथे आला. त्याला वाटलं त्याच्या जमीनीवर काहीतरी बेकायदा काम सुरु आहे, त्याने रागाने सरळ बंदुकीची नळीच रोखली. यथावकाश त्याला कातळशिल्प, त्याचं महत्त्व याबद्दल सगळं पटवून दिल्यानंतर त्याचं समाधान झालं. आता तीच व्यक्ती कातळशिल्पांच्या संवर्धनाचं महत्त्व तर जाणतेच पण इतरांनासुद्धा ते पटवून देते.

  • कशेळीला ५० बाय ४० फुटाची आकृती आहे. तिचे फोटो कसे काढायचे हाच प्रश्न होता, कारण साध्या किंवा मोबाइल कॅमेऱ्याने त्याचे फोटो काढणं केवळ अशक्य होतं. मग चक्क एका गाडीवर शिडी लावून नंतर त्यावर सेटअप करून कातळशिल्पाचे फोटो काढले.

  • एकदा एके ठिकाणच्या सड्यावर कातळशिल्प असल्याने तंगडतोड करत सगळी टीम तिथे पोहोचली तर तिथले गावकरी म्हणू लागले, ''अहो आमच्या सड्यावर ती कातळशिल्प वगैरे नाहीत. ''

    एकजण म्हणाला, ''ते आमच्या आज्याने काहीतरी कोरलेलं आहे. तो जेव्हा गुरं राखायला जायचा तेव्हा फावल्या वेळात हे कोरत बसायचा.''

आता आली का पंचाईत. तितक्यात त्या बोलणाऱ्या व्यक्तीचे आजोबाच तिथे आले.

त्याना विचारल्यावर ते म्हणाले, मी नाय बा कोरलेला. माझ्या आज्याने कोरलेला असंल...

मग ऋत्विज आणि टीमने त्यांना हिशोब करून दाखवला. तुमचे आजोबा किमान ७०-८० वर्षांचे त्यांचे आजोबा म्हणजे आणखी ७०-८० पुढे. म्हणजे ही कातळशिल्प किमान दीडशे वर्षं जुनी असतील की नाही. मग ही जुनीच आहेत. प्राचीनच आहेत. आता आपण आणखी थोडा शोध घेऊया...

अशाप्रकारे बाबापुता करून, कधी समजावून, कधी नियमांचा थोडा धाक दाखवून अखेर स्थानिकांना या कातळशिल्पांचं महत्त्व पटवण्यात ऋत्विज आणि सहकारी यशस्वी झाले आहेत.

petroglyphs - fig
petroglyphs - figE sakal

सध्या काय?

कोकणातील वारसा पर्यटन वृद्धी व कोकणातील कातळ खोद चित्रांचे समग्र दस्तावेजीकरण आणि संशोधन प्रकल्पाला केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, दिल्ली यांच्याकडून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत आयआयटी मद्रास, आयआयटी हैद्राबाद, जेएनयू, जे जे स्कूल ऑफ आर्ट, सेंटर फॉर एक्स्ट्राम्युरल स्टडीज, मुंबई आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांनी संयुक्त विद्यामाने कातळशिल्पांचा अभ्यास, त्याचे डिजिटल दस्तावेजीकरण आणि संवर्धन यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

याच प्रकल्पावर सध्या आयआयटी मद्रासमार्फत ऋत्विज आपटेची नेमणुक करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला खूप शुभेच्छा!!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com