
रांगडा पैलवान गडी एका घटनेनं पार कोलमडून पडला. पण त्याच्या सोबतच्या लोकांनी साथ सोडली नाही. शॉक लागून दोन्ही हात गमावले पण तिचं प्रेम सोबत राहिलं. सात वर्षांच्या प्रेमानंतर दोघांच्या संसाराला सुरुवात झालीय. लग्नानंतर त्यानं उखाणा घेताना तिच्या प्रेमाचा उल्लेख केला अन् सर्वांनाच गहिवरून आलं. दोन्ही हात गमावले पण तिचं प्रेम नाही असा उखाणा घेतलेल्या पैलवान रोहन मांजरेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय. त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. रोहनने सेजल मांडलेकर हिच्याशी लग्न केलंय. मेकअप आर्टिस्ट असलेल्या सेजलने रोहनला त्याच्या कठीण काळातही खंबीरपणे साथ दिली आणि आता आयुष्याचा जोडीदार म्हणून त्याच्यासोबत सप्तपदी घेत लग्न केलं.