गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य-रोहित लागले कामाला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपल्यासाठी ऐतिहासिक ठेवा असून खऱ्या अर्थाने महाराजांच्या पराक्रमाची स्मारकं आहेत. त्यांची जपणूक आणि संवर्धन करण्याची फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरच आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके असलेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सरसावले असून, त्यांनी या संदर्भात निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा कसा मिळेल, याकडे लक्ष देणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोहित पवार यांनी या संदर्भात फेसबुकवर पोस्ट लिहीत म्हटले आहे, की आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले हा आपल्यासाठी ऐतिहासिक ठेवा असून खऱ्या अर्थाने महाराजांच्या पराक्रमाची स्मारकं आहेत. त्यांची जपणूक आणि संवर्धन करण्याची फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवरच आहे. तसंच या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा (वर्ल्ड हेरिटेज) दर्जा कसा मिळेल यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याकडे विनंती केली. त्यांनीही माझ्या मागणीला पूर्ण सहमती दर्शवली आणि याबाबत अभ्यास सुरु असून महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाच पाहिजे, असं स्पष्ट मत मांडलं. तसंच एका स्वतंत्र कार्यक्रमाची आखणी केली जाईल आणि या माध्यमातून गड-किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शिवप्रेमींकडून अनेक वर्षांपासून गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगडासाठी निधी उपलब्ध केला होता. आता या युवा नेत्यांनी यामध्ये लक्ष घातल्याने अनेक निर्णय मार्गी लागण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rohit pawar aditya thackeray trying to get world heritage for forts in maharashtra