
राष्ट्रवादीचीही हिंदुत्वाच्या शर्यतीत उडी? रोहित पवार म्हणतात..
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. सहकुटुंब ते सध्या दौऱ्यावर गेले असून त्यांनी राज्यातल्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. राज ठाकरेंवरही त्यांनी अयोध्येत टीका केली आहे. फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेने नाकारलं, असंही रोहित पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर या दौऱ्यानिमित्त उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचंही उत्तर दिलं आहे.
सध्या राज्यातल्या अनेक नेत्यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या आधीच रोहित पवारांनी अयोध्या दौरा केल्याने चर्चांना उधाण आलं होतं. आता राष्ट्रवादीही हिंदुत्वाच्या स्पर्धेत उडी घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यालाच रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. पवार म्हणाले, "नाही मी राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मी इथे आलेलो नाही. मी रोहित पवार म्हणून इथे आलेलो आहे. आणि माझा स्वतःचा असा काही विचार असू शकतो. माझा विचार मला जे सांगतो, की जिथे गेल्यावर मला प्रसन्न वाटतं, मला बरं वाटतं, एक दिशा मिळते, अशा प्रेरणा ठिकाणी मी नेहमी जात असतो. धार्मिक विषय हे व्यक्तिगत असतात, त्याची कोणीही टिमकी वाजवत राजकारण करू नये हे माझं मत आहे. मग ते भाजपासाठी असेल किंवा आता ज्या पद्धतीने मनसे वागतेय त्याबद्दल असून शकतं. "
हेही वाचा: राज ठाकरेंआधीच रोहित पवार अयोध्येत; रामलल्लाचं दर्शन घेणार?
रोहित पवार पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात तोडातोडीचं राजकारण स्वीकारलं जाणार नाही. आपल्यासाठी एकी, एकता, समानता महत्त्वाची. आणि गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही समाजांमध्ये काही वाद झाला नाही, त्यावरून लोकांना काय हवंय ते त्यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे त्याच्यावरून ठरवावं की तोडातोडीचं राजकारण करावं की नाही. करायचंच असेल तर विकासाचं राजकारण करा".
Web Title: Rohit Pawar Ayodhya Tour Says About Nationalist Congress Party Hinduism
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..