Rose Day 2023 : परदेशातल्या युगुलाच्या प्रेमाला कोल्हापूरच्या माळरानावरचाा ‘गुलाब आहे साक्षीला’  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rose Day 2023

Rose Day 2023 : परदेशातल्या युगुलाच्या प्रेमाला कोल्हापूरच्या माळरानावरचाा ‘गुलाब आहे साक्षीला’ 

जगभरात १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे उत्साहात साजरा होत आहे. आजपासून व्हॅलेंटाईन विकला सुरूवात होत आहे. आज रोज डे असून एकमेकांप्रती असलेले प्रेम गुलाबाचे फुल देऊन व्यक्त करण्यात येते. जगभर हा दिवस साजरा होतो. रोज डेच्या निमित्ताने एक खास गोष्ट जाणून घेऊयात.

परदेशातील प्रेमी युगुलाच्या प्रेमाला आपल्या कोल्हापूरच्या गुलाबाची साक्ष आहे. तिकडे एखादी प्रेमकथा फुलते तेव्हा तिथे लागणारा गुलाब आपल्या कोल्हापूरातल्या शिरोळमधील कोंडिग्रे या गावातील असतो. गेल्या अनेक वर्षांपासून नित्यक्रमाने महाराष्ट्रातला गुलाब परदेशातील कपल्पचे प्रेम वाढवत आहे. कोंडिग्रे गावातील याच हरितगृहाबद्दल आज जाणून घेऊयात.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडिग्रे गावाच्या माळरानावर हजारो फुलांना फुलवणारे गणपतराव पाटील म्हणजे प्रयोगशील शेतकरी होय. संगणकाद्वारे ठिबक सिंचनाचा प्रयोग असो किंवा कोकोपीटाद्वारे मातीची गुणवत्ता वाढवण्याचा, त्यांनी हे सर्व प्रयोग यशस्वी करून दाखविले. चारावरून दहा आणि पुढे वीस एकरांचा टप्पा गाठणाऱ्या "श्रीवर्धन बायोटेक'चे गणपतराव पाटील यांची मनीषा एवढ्यावरच थांबत नाही.

शेतीत सर्वोत्तम करताना अनेक अडचणी आल्या, वाटेत काटे आले; पण "काट्यातच गुलाब' फुलतो, हे मनावर वारंवार बिंबवत "श्रीवर्धन बायोटेक'चे गणपतराव पाटील यांनी आपल्या ग्रीनहाऊसचा विस्तार साधला. गणपतराव पाटील यांचे वडील सा. रे. पाटील पाठीशी ठाम राहिले. आज त्यांचे "श्रीवर्धन बायोटेक' देशातील सर्वांत मोठे ग्रीन हाऊस आहे. जपान, ग्रीस, इटली, ऑस्ट्रेलिया, हॉलंड इत्यादी देशांत येथून फुले निर्यात होतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरशेजारील कोंडिग्रे या खेड्याच्या माळरानावर पाटील यांचा हा प्रकल्प आहे. ग्रीन हाऊसमध्ये फुला-फळांचे उत्पादन घेण्याचे 1993 पासून त्यांचे स्वप्न. ते 1998 मध्ये सत्यात उतरले. आज 101 एकरांत हा प्रकल्प उभा आहे. 28 वाणांचे गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड, शेवंती यांसारख्या फुलांचे उत्पादन येथे होते.

रोज सरासरी पंचवीस ते तीस हजार गुलाब आणि ऐंशी हजार जरबेराची फुले निर्यातीसाठी सज्ज असतात. "भारतातील सर्वाधिक फूल उत्पादक' व "भारतातून सर्वाधिक फूलनिर्याती'बद्दल पुरस्कार या प्रकल्पाला मिळाले आहेत.

इस्राईल बनावटीची ठिबक यंत्रणा येथे आहे. फुलांची प्रत चांगली राहावी, याकरिता चार हजार चौरस फूट क्षेत्रावर शीतगृह आहे. तेथे तीन ते चार लाख फुलांची साठवण केली जाते. फुलांचे चांगल्या पद्धतीने ग्रेडिंग करता यावे, यासाठी सहा हजार चौरस फुटांचा वातानुकूलित पॅकिंग हॉल आहे. दोन ते पाच अंश सेल्सिअस तापमानात फुलांचे पॅकिंग करून ती वातानुकूलित गाडीतून मुंबई विमानतळापर्यंत पोचविली जातात. दरवर्षी २० ते २५ लाख फुले परदेशातील व्हॅलेंटाईन खास बनवायला पोहोचतात.