शतायुषी शिवऋषीला मुकलो, देशभक्तीचा वसा त्यांना संघशाखेतून - मोहन भागवत | Babasaheb Purandare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'शतायुषी शिवऋषीला मुकलो, देशभक्तीचा वसा त्यांना संघशाखेतून'

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

'शतायुषी शिवऋषीला मुकलो, देशभक्तीचा वसा त्यांना संघशाखेतून'

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपण एका शतायुषी शिवऋषीला मुकल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती निष्ठेने चालवली असेही भागवत यांनी म्हटले. शिवशाहीर बाबासाहेबांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे आयुष्य पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पद्मभुषण व महाराष्ट्रभुषण पुरस्कारप्राप्त आदरणीय बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने आपण सर्वच एका शतायुषी शिवऋषीला मुकलो आहोत. तरुण वयापासूनच देशभक्तीचा वसा त्यांना संघशाखेतून प्राप्त झाला. तो ध्यास मनात ठेवून ध्येय प्राप्तीकरिता तत्वरूप आदर्श पुरुष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांची भक्ती त्यांनी जीवनभर निष्ठेने चालवली असे भागवत यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाचं दु:ख शब्दांपलिकडचे - PM मोदी

भागवत यांनी म्हटलं की, दादरा नगर हवेलीच्या मुक्तिसंग्रामात सैनिक म्हणून ते लढले होते. शिवाजी महाराजांची कथा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर त्यांनी घराघरात पोहोचवली. त्यासाठी जीवनभर असंख्य परिश्रम केले. अत्यंत कठीण परिस्थितीतून केलेल्या या वाटचालीतुनच "जाणताराजा" सारख्या भव्य व प्रेरक नाट्य शिल्पाची निर्मिती त्यांनी केली. त्या देशभक्त व परिश्रमी शिवशाहीर यांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे स्फूर्तीदायक जीवन समाजामध्ये पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील. त्यांच्या पवित्र व प्रेरक स्मृतीला माझी व्यक्तिगत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विनम्र श्रद्धांजली.

loading image
go to top