esakal | 'पदावर रावणाची ‘शुर्पणखा’ नको'; चित्रा वाघ यांचं चाकणकरांच्या नियुक्तीबाबत खोचक ट्विट
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर

'पदावर रावणाची ‘शुर्पणखा’ नको'; चित्रा वाघ यांचं चाकणकरांच्या नियुक्तीबाबत खोचक ट्विट

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे. या पदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा आज गुरुवारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवरच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक खळबळजनक असं ट्विट केलंय.

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा आहे. याबाबतची घोषणा आज अथवा उद्या होणार असल्याची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवरच चित्रा वाघ यांनी केलेलं एक ट्विट सध्या चर्चेत आहे.

महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल. असं ट्विट त्यांनी केलंय.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं हे ट्विट अत्यंत सूचक मानलं जातंय. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन चित्रा वाघ यांनी केलेलं हे सूचक ट्विट रुपाली चाकणकर यांच्या नियुक्तीवर निशाणा साधणारं आहे. मात्र, या ट्विटमधील रावण कोण आणि शूर्पनखा कोण? याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाहीये. त्यांनी नेमका कुणावर निशाणा साधलाय, याबाबतच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून याबाबत सरकारवर वारंवार टीका होत होती. मात्र, आता अखेर सरकारनं यापदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती केली आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा आज गुरुवारी होण्याची शक्यता आहे.

काल शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली होती. यामध्ये पक्षाचे मंत्री आणि खासदार यांचा समावेश होता. या बैठकीत याबाबत चर्चा झाली त्यांनतर चाकणकर यांच्या नावाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली.

loading image
go to top