esakal | या बकरीचा समद्यासनी लागेल लळा; दूधाची राणी ‘सानेन’ महाराष्ट्रात

बोलून बातमी शोधा

sanen sheep maharashtra 5 to 12 litre milk}

सानेन जातीच्या बकरीचे मूळ स्वित्झर्लंड असून आता या बकऱ्या युरोप, अमेरिकेपासून अफगाणिस्तानातही शेतकरी मोठ्या प्रमाणात पाळतात.

या बकरीचा समद्यासनी लागेल लळा; दूधाची राणी ‘सानेन’ महाराष्ट्रात
sakal_logo
By
दीपा कदम

मुंबई - बकरीचे दूध आरोग्यासाठी लाभदायक असले तरी ती अर्धा लिटरपेक्षा कमी दूध देते. त्यामुळे बकरीच्या दूधाचा विक्रीच्या दृष्टीने विचार होत नाही. मात्र बकरीच्या दूधाला मोठ्या प्रमाणात बाजारात मागणी असल्याने अधिक दूध देणाऱ्या सानेन जातीच्या बकऱ्यांना राज्यात आणले जाणार आहे. सानेन जातीची बकरी दिवसाला ५ ते १२ लिटर दूध देते.बकरीच्या दूधापासून इतर पदार्थ तयार करुन शेतकऱ्यांना आर्थिक कमाईसाठी राज्य सरकार हा प्रयोग करणार आहे. युरोप मधून या बकऱ्या खरेदी केल्या जातील.

पशु, दुग्ध व मत्स्य विभागातंर्गत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. सानेन जातीच्या बकरीचे मूळ स्वित्झर्लंड असून आता या बकऱ्या युरोप, अमेरिकेपासून अफगाणिस्तानातही शेतकरी मोठ्या प्रमाणात पाळतात. महामंडळातर्फे २० बकऱ्या आणि दोन बकरे खरेदी करण्यास पद्‌म विभागाने मंजुरी दिली आहे.

हे वाचा - ‘एमएसपी’मध्ये ऐतिहासिक वाढ : नरेंद्र मोदी

बकरीच्या दूधाला देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पण आपल्याकडे तेवढे दूध पुरविण्याची क्षमता नाही. देशातील बकरीच्या दूधाच्या उत्पादनात राज्याचा वाटा केवळ ४.०६ टक्के आहे. बकरीच्या दुधाची एक लिटर किंमत ७०० रुपयांपेक्षा अधिक आहे.
सुनील केदार, पशुसंवर्धन मंत्री

हे वाचा - वेतन आणि पेन्शन मिळणं सरकारी कर्मचाऱ्याचा अधिकार- सर्वोच्च न्यायालय

राज्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विभागाच्या संशोधनासाठी या बकऱ्या ठेवल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या हवामानात त्या कशा जुळवून घेतात याविषयीचा अभ्यास करून काही काळानंतर त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. बकरीची किंमत दीड लाखांपासून सहा लाखांपर्यंत आहे. यासंदर्भात या पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केंद्रीय बकरी अनुसंधान संस्थान, मथुरा येथे भेट देवून राज्य सरकार सानेन जातीच्या बकऱ्या तसेच बकऱ्यासंदर्भात इतर सुरू असलेल्या प्रयोगांची माहीती घेतली.