
पुणे : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मराठी साहित्याची पताका उंचावल्यानंतर आता एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात सारस्वतांचा मेळा भरणार आहे. आगामी ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार असल्याची घोषणा रविवारी झाली. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला शताब्दीच्या उंबरठ्यावरील ऐतिहासिक संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे.