स्वप्नपूर्तीची ताकद मोदी व भाजपमध्येच - देवेंद्र फडणवीस 

मृणालिनी नानिवडेकर  
मंगळवार, 23 एप्रिल 2019

महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्त्वाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी त्यांनी "सकाळ'शी वर्षा या निवासस्थानी तसेच विमानप्रवासात संवाद साधला. 

महानगरे असोत, छोटी शहरे किंवा गावे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला मतदान करण्याची सुप्त लाट सर्वत्र दिसते आहे. भारतीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्ये असल्याचा विश्‍वास जनतेत असल्याने आम्ही पुन्हा सत्तेत परतणार आहोत, अन्‌ महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गेल्या वेळचीच संख्या राखणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक महत्त्वाच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी त्यांनी "सकाळ'शी वर्षा या निवासस्थानी तसेच विमानप्रवासात संवाद साधला. या मुलाखतीतील प्रमुख अंश ... 

प्रश्‍न : जनता कमालीची नाराज आहे. युवकांच्या हातांना काम का मिळाले नाही ? हा भ्रमनिरास मतपेटीतून डोकावेल? 
मुख्यमंत्री :
नाराज आहेत ते काही मूठभर मोदीविरोधक, भाजपद्वेष्टे. जनता नव्हे. मतपेटीत वैफल्य वगैरे नाही, विश्‍वास टाकला जातो आहे. रोजगार या विषयावर प्रचंड चर्चा झाली. आपल्या देशातील 50 टक्‍के लोकसंख्या ही तरुण आहे. अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला रोजगार नसता तर देशात यादवी झाली असती. जीडीपी वाढला, तो सेवाक्षेत्रातील रोजगार वाढल्यामुळेच. रोजगारनिर्मितीचे अहवाल केंद्राला पाठवले जातात, मुख्यमंत्री म्हणून ते माझ्या पहाण्यात येतात. त्यात कर्नाटक सरकारने लिहिलेले असते 30 लाख रोजगार वाढले, पश्‍चिम बंगालने नमूद केलेले आढळते 18 लाख. ही दोन्ही राज्ये भारतात आहेत, आमच्या पक्षाची सत्ता तेथे नाही. मला वाटते आकडेवारी सादर करायची अन्‌ प्रचार वेगळा करायचा हा खोटेपणा योग्य नव्हे. 

प्रश्‍न : देशातील समस्यांकडे लक्ष पुरवण्यात अपयश आल्याने राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणला का? 
मुख्यमंत्री :
राष्ट्रवादावर श्रद्धा असलेला आमचा पक्ष आहे. राष्ट्रवादाची चर्चा सुरू झाली ती कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर. पुलवामाचा विषय आम्ही प्रचाराचा केला नव्हताच. मात्र कॉंग्रेसने तुकडे "गॅंग'ला प्रोत्साहन देणारी भाषा केली. त्यांच्या आग्रहामुळे देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची भाषा केली गेली. काश्‍मीर खोऱ्यात पाकिस्तानकडून पैसा घेऊन प्रत्यक्ष सैन्यावर काही देशकंटक दगडफेक करत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्या सैन्यदलांचे मनोबल कमी करण्यासाठी "अफ्स्पा' कायदा मागे घेण्याचा मनोदय व्यक्‍त केला गेला. हे भयावह आहे. त्यामुळे मग आम्ही अशा राष्ट्रद्रोह्यांना प्रोत्साहन देणारे राहुल गांधी पंतप्रधान झालेले चालतील का? असा प्रश्‍न सभांमध्ये केला. आमच्या राष्ट्रवादाच्या भूमिकेला सर्वाधिक प्रतिसाद मिळतो. पण त्या विषयाला हात घालण्यापूर्वी मी त्या त्या जिल्ह्यात उभे झालेले रस्त्यांचे जाळे, पूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या सिंचनप्रकल्पांची स्थिती आणि मोदींच्या कार्यकाळातल्या योजनांबद्दल बोलतो. 

प्रश्‍न : सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक गर्दी खेचणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलवामानंतर पाकिस्तानातील बालाकोटमध्ये झालेले हल्ले वादग्रस्त ठरवले आहेत. 
मुख्यमंत्री :
सर्वप्रथम राज ठाकरेंनी आरोप केला तो पंतप्रधानाच्या सुरक्षा सल्लागाराची पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी भेट झाल्याचा. कागद सादर केले, प्रत्यक्षात ते उल्लेख होते 2017 साली झालेल्या राजनैतिक भेटीचे. मग दिशाभूल केली ती विदेशी मीडियाचा अहवाल देत पाकची विमानसंख्या तेवढीच असल्याची. असा कोणताही अहवाल प्रसिद्ध झाला नसल्याचे पेंटॅगॉनने स्पष्ट केले अन्‌ पाकची विमानसंख्या कमी झाल्याचे सत्यही समोर आले. राज इतके वैफल्यग्रस्त झाले आहेत की उद्या ते असेही म्हणतील की ट्रम्प यांनी देवेंद्र फडणवीसांना सुपारी दिली आहे. काय बोलायचे? निवडणुकीत उमेदवार नसणे हा कोणत्याही राजकीय पक्षासाठी लज्जास्पद प्रकार. त्याचेही ते कौतुक करतात. 2009 ते 2014 या काळात राज प्रमुख नेते होते, ते मोदी लाटेत धुतले गेले. त्यांचे वैफल्य बोलतेय. त्यांच्या बेलगाम आरोपांवर बोलायचे तरी काय ते मैदानातच नाहीत, पाच महिन्यांनी निवडणूक लढवतील तेव्हा बोलू त्यांच्यावर. 

प्रश्‍न : पण प्रतिसाद मिळतोय ना त्यांना .. 
मुख्यमंत्री :
(मध्येच तोडत) रिंगणात न उतरल्याने नखे काढली आहेत त्यांनीच स्वत:ची. शेळी झाले आहेत जणू. जेथे विरोधी पक्षाचे बडे उमेदवार आहेत तेथेच ते जातात. हे बडे नेते आमच्याविरोधात जिंकलेच तर, ते दावा करणार माझ्या प्रचाराचा परिणाम. हरले तर म्हणणार मी कुठे त्यांना निवडून द्या असे बोललो होतो. या प्रचाराची पावती म्हणून ते विधानसभेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत गेले असतील हे मात्र खरे. संजय निरूपम त्यांना काय म्हणाले ते मी उच्चारत नाही, पण तरीही ते तिकडे जाणार. 

प्रश्‍न : मनसेचा मतदार खरे तर युतीचाच, तुमच्याकडचे नेते त्यांचे मित्र. त्यांना तुमच्यात यायचे होते काय ? 
मुख्यमंत्री :
होय. आधी व्यक्‍ती म्हणून आमच्या लोकांची मैत्री होती त्यांच्याशी. त्यांना आमच्यात यायचे आहे काय? हा प्रश्‍न चांगला आहे पण, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. 

प्रश्‍न : फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत असे राज म्हणाले आहेत मुलाखतीत.. 
मुख्यमंत्री :
हो. मी महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या कौलाची दखल घेत देशाच्या लाडक्‍या पंतप्रधानांनी या खुर्चीवर बसवलेला मुख्यमंत्री आहे. जनतेच्या नाराजीमुळे घरी बसवलेला गेलेला राज ठाकरे नाही. 

प्रश्‍न : महाराष्ट्रात खरा सामना कुणाशी आहे ? कॉंग्रेस का राष्ट्रवादी ? 
मुख्यमंत्री :
शरद पवारसाहेब महागठबंधनाचे शिल्पकार आहेत. येथे कॉंग्रेस "बी' चमू आहे, पवारसाहेबांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रमुख खेळाडू. त्यातच पवारसाहेबांसारखा अत्यंत महत्त्वाचा धोरणी नेता उखडायचे ते उखाडा, अर्धी चड्डीवाले अशी भाषा वापरतो आहे ते दुर्दैवी आहे. पराभव दिसू लागल्याने ते अस्वस्थ झाले असावेत. मोदीलाटेची व्याप्ती त्यांना कळली असल्यानेच त्यांनी निवडणूक जातीपातीच्या पातळीवर नेली आहे. खरे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ज्या जागा लढते तेथे बहुतांश ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत. मोदी लाट शिवसेनेला दिसते आहे अन्‌ पवारसाहेबांनाही दिसत असावी. त्यामुळेच ते रिंगणात उतरलेच नाहीत. पवारसाहेब लढत असतील तर मी लढतो असा आग्रह सुभाषबापू देशमुखांसह बऱ्याच जणांनी धरला होता. यादी मोठीच होती. पवारसाहेबांचा पक्ष प्रचंड आर्थिक ताकद बाळगून आहे. प्रचारावर प्रचंड खर्च करताहेत ते. पण जनता त्यांच्यावर नाराज आहे. अशा असंतोषाला विरोधातला राजकीय पक्ष व्यक्‍त होण्याची संधी देतो. मुळात असा असंतोष बालेकिल्ल्यातही का निर्माण झाला यावर राष्ट्रवादीने विचार करायची गरज आहे. अर्थात हा त्यांचा विषय आहे. आमच्या दृष्टीने पाहिले तर त्यांच्या हातात असलेले मतदारसंघही आम्ही हमखास जिंकणार आहोत. कॉंग्रेस तर कुठे दिसतही नाही. 

प्रश्‍न : राज्याचे चित्र काय ? 
मुख्यमंत्री :
ऍडव्हान्टेज मोदी. उत्तम प्रतिसाद. पहिल्या टप्प्यात 17 ठिकाणी मतदान झाले. 13 ठिकाणी आम्ही सरळ विजयी होत आहोत. चार ठिकाणी ऍडव्हान्टेज आहे. 

प्रश्‍न : फक्‍त ऍडव्हान्टेज? का असे? 
मुख्यमंत्री :
हे "ऍडव्हान्टेज' आमच्या बाजूने निकाल देणारे आहे. 

प्रश्‍न : भाजप धृवीकरण करतोय. दहशतवादाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देणे हा त्यातला प्रकार आहे. 
मुख्यमंत्री :
साध्वीला एनआयएने राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने क्‍लीन चिट दिली आहे. त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेताना तुम्ही कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे देखील जमानतीवर असलेले आरोपी आहेत हे का विसरता? आक्षेप असलाच तर तो दोघांवरही घ्या. हिंदू दहशतवादाचे "नरेटिव्ह' निर्माण करण्यासाठी कॉंग्रेसने केलेल्या राजकारणाचा तो भाग होता. अल्पसंख्याक समाज कॉंग्रेसवर नाराज होता, तो जवळ यावा यासाठी काही मंडळींनी हा विषय पेटवला एवढेच म्हणतो आत्ता. मात्र स्व. हेमंत करकरे हे महाराष्ट्र पोलिस दलातले कर्तव्यदक्ष प्रामाणिक आणि उमदे अधिकारी होते, साध्वींनी त्यांच्यावर टीका करायला नको होती. 

प्रश्‍न : महाराष्ट्रात पाठोपाठ निवडणुका आहेत. राधाकृष्ण विखे पाटील पक्षप्रवेश केव्हा करणार ? 
मुख्यमंत्री :
तशी कोणतीही चर्चा नाही. भाजप-शिवसेनेतले जागावाटप योग्यरीतीने होणे एवढाच विधानसभांसाठीचा प्रश्‍न आहे. आज 90 टक्‍के कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे. त्यामुळे पुढेही सगळे चांगलेच होईल. दुष्काळासारखे प्रश्‍न हाताळणे, जनतेला दिलासा देणे ही कामे महत्त्वाची आहेत. माझे सर्व सहकारी आज निवडणुकीत आहेत. चंद्रकांतदादांनी पश्‍चिम महाराष्ट्रात ठिय्या दिला आहे. मुनगंटीवार महाराष्ट्रात फिरताहेत. पंकजाताई, तावडे सभा घेताहेत. हीच चमू विधानसभा यशस्वी करेल. 

प्रश्‍न : पण खडसे ? ते कुठे आहेत ? जळगावात स्वयंशिस्तीच्या तुमच्या पक्षात मंचावर मारामाऱ्या झाल्या 
मुख्यमंत्री :
नाथाभाऊ आजारी होते. ते तरीही खानदेश सांभाळताहेत. मारामारीचा प्रकार अयोग्य होता. त्यांना कारणे दाखवा नोटिसा प्रदेशाध्यक्षांनी बजावल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal exclusive interview Devendra fadnavis