‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने ३६ जणांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Idols of Maharashtra

विविध समाजघटक, विविध क्षेत्रात अत्‍यंत खडतर वाटचाल करत त्‍या- त्‍या क्षेत्रात दीपस्तंभ बनलेल्‍या व्‍यक्‍ती, संस्‍थांच्‍या कार्याची दखल दैनिक सकाळ विविध माध्‍यमांतून घेत आहे.

Sakal Idols of Maharashtra : ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने ३६ जणांचा गौरव

सातारा - डॉक्टर हा पेशा केवळ एका व्यवसायापुरता मर्यादित न ठेवता, आपल्याकडे उपचार घेण्यासाठी येणारा प्रत्येक रुग्ण बरा झाला पाहिजे, याचा ध्यास प्रत्येक डॉक्टर घेतात. स्वतःची काळजी घेणे आणि रुग्णसेवा करणे या दोन्ही आघाड्यांवर काम करणाऱ्या डॉक्टरांचा दिमाखदार कौतुक सोहळा ‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने देविका लॉन्स येथे आयोजित केला होता. या सोहळ्यात एकूण ३६ डॉक्टरांना ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विविध समाजघटक, विविध क्षेत्रात अत्‍यंत खडतर वाटचाल करत त्‍या- त्‍या क्षेत्रात दीपस्तंभ बनलेल्‍या व्‍यक्‍ती, संस्‍थांच्‍या कार्याची दखल दैनिक सकाळ विविध माध्‍यमांतून घेत आहे. यासाठी सुरू केलेल्‍या आयडॉल्‍स ऑफ महाराष्‍ट्र या सन्‍मान श्रृंखलेचा दिमाखदार सोहळा काल (शनिवार) पार पडला. या कार्यक्रमाची उत्‍सुकता वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या प्रत्‍येकाला लागून राहिली होती. आकर्षक विद्युतरोषणाई, तालसुरांची संगत आणि भारलेल्‍या व सायंकाळच्‍या आल्‍हाददायक वातावरणात डॉ. हिम्‍मतराव बावस्‍कर, जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्‍या उपस्‍थितीत या सोहळ्यास सुरुवात झाली. सन्‍मान करणाऱ्याचे हात आणि सन्‍मान स्‍वीकारणाऱ्याचे हात तेवढ्याच ताकदीचे, तोलामोलाचे असल्‍याने या कार्यक्रमाची रंगत वाढीस लागली होती.

उत्कृष्ट निवेदन आणि गायन मैफलीमुळे रंगत

सुमारे तीन तासांहून अधिक काळ चाललेल्‍या या दिमाखदार कार्यक्रमात रंगत आणली ती साताऱ्यातील सुप्रसिद्ध निवेदक सुनील मोरे यांच्या सूत्रसंचालनाने आणि कोल्हापूरच्या रुद्रम रॉक बँडच्या संगीत मैफलीने. श्री. मोरे यांनी आपल्या भारदस्त आणि सुमधुर शब्दांनी सूत्रसंचालन करत हा कार्यक्रम पुढे नेला.

रुद्रम रॉक बॅण्डचे रोहित सुतार, जुनेद शेख यांनी मराठी, हिंदी गाणी सादर केली. या गाण्‍यांमुळे संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. सूत्रसंचालन आणि गायन मैफलीला उपस्थितांनी भरभरून दाद दिलीच; पण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनीही श्री. मोरे यांचे, तसेच रुद्रम रॉक बँडचे विशेष कौतुक केले.

उपचाराबरोबरच संशोधन महत्त्‍वाचे - डॉ. बावस्‍कर

सातारा : वैद्यकीय शिक्षण घेताना उपचार पद्धती शिकवली जाते, मात्र संशोधन कसे करायचे ते शिकवले जात नाही. प्रत्‍येक डॉक्‍टरने उपचाराबरोबरच संशोधनाला महत्त्‍व देणे आवश्‍‍यक असून, तीच देशसेवा असल्‍याचे मत सुप्रसिद्ध संशोधक पद्मश्री डॉ. हिम्‍मतराव बावस्‍कर यांनी व्‍यक्‍त केले.

दै. ‘सकाळ’च्‍या वतीने आयोजित आयडॉल्‍स ऑफ महाराष्‍ट्र या कार्यक्रमादरम्‍यान ते बोलत होते. जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, ‘सकाळ’चे सरव्‍यवस्‍थापक (जाहिरात) उमेश पिंगळे, सहयोगी संपादक राजेश सोळस्‍कर, मुख्‍य व्‍यवस्‍थापक राजेश निंबाळकर उपस्‍थित होते. कार्यक्रमात डॉ. बावस्‍कर, जिल्‍हाधिकारी जयवंशी यांच्‍या हस्‍ते जिल्ह्यातील डॉक्‍टरांचा सन्‍मान करण्‍यात आला.

डॉ. बावस्‍कर म्‍हणाले, ‘कोरोनाने वैद्यकीय क्षेत्रापुढे मोठे आव्‍हान उभे केले होते. भारतात कोरोना फैलावल्‍यानंतर संपूर्ण समाजमन धास्‍तावले होते. या काळात सुमारे चार हजारहून अधिक जणांवर उपचार केले. उपचारादरम्‍यान अनावश्‍‍यक औषध पद्धतीचा अवलंब केला नाही. अनावश्‍‍यक चर्चांमुळे कोरोनाविषयी अनेक गैरसमज पसरले. त्‍यातून मोठे नुकसान होण्‍यास सुरुवात झाली. कोरोना हे राष्‍ट्रीय संकट होते आणि ते सर्वांनी केलेल्‍या सांघिक प्रयत्‍नातून दूर झाले. या संकटानंतर भारत उभारी घेत आहे. कोरोनाच्‍या काळात वैद्यकीय क्षेत्रात काही चांगल्‍या गोष्‍टी घडल्‍या, तसेच काही वाईट गोष्‍टीही घडल्‍या.

ते नाकारून चालणार नाही. कोरोनाबाधितांवर उपचार करताना ती त्‍यावरील संशोधन देखील सुरूच ठेवले. या काळात संशोधनाअंतीच्‍या बाबींमुळे कोणत्‍याही रुग्‍णास अनावश्‍‍यक औषधे, प्रतिजैविके देणे टाळले.’

बदलत्‍या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्‍य समस्‍या वाढत आहेत. या समस्‍या आपण सहज टाळू शकतो. समाजाचे आरोग्‍य जपायचे असेल तर डॉक्‍टरांनी सर्वात पहिल्‍यांदा आपले आरोग्‍य जपले पाहिजे. आठवड्यातून एक दिवस समाज माध्‍यमे, टीव्‍ही व इतर वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे, लवकर झोपून लवकर उठलेच पाहिजे, आनंदी राहा आणि आनंदी जगा. जीवन सुंदर असून, ते मनसोक्‍त जगा. दुसऱ्याच्‍या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपली ऊर्जा वाढवा आणि आनंद द्यायला, घ्‍यायला शिका, असा सल्‍लाही त्‍यांनी उपस्‍थितांना दिला.

श्री. सोळसकर यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विशद केली. सुनील मोरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. निंबाळकर यांनी आभार मानले.

संशोधन करा स्‍वखर्चाने

बुलडाणा येथील एका गावातील ग्रामस्‍थ गंभीर आजारांनी ग्रासले होते. याची माहिती मिळाल्‍यानंतर महाड येथून सहाशे किलोमीटरचे अंतर कापत ते गाव गाठले. त्‍याठिकाणची माती, पाणी व इतर वस्‍तूंचे सुमारे ६० नमुने संकलित करत पुन्‍हा महाड गाठले. प्रत्‍येक नमुन्‍याच्‍या तपासणीसाठी ४ हजार मोजले. मी मोठा श्रीमंत नाही किंवा माझी सामाजिक संस्‍थाही नाही. नमुने तपासणीचे अहवाल आले आणि माती व पाण्‍यात मोठ्या प्रमाणात विषद्रव्‍ये असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. यानंतर त्‍यावरील सखोल संशोधन करत आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविल्‍या. संशोधन हे आपले काम असून, त्‍यासाठी अभ्‍यास महत्त्वाचा आहे. संशोधनावेळी स्‍वत:ला प्रश्‍‍न विचारा असे सांगत स्‍वखर्चाने केलेले संशोधनच यशस्‍वी होते, असे मत डॉ. बावस्कर यांनी मांडले.

यांचा झाला सन्‍मान

डॉ. सुरेश शिंदे, डॉ. विनय जोगळेकर, डॉ. रोहन अकोलकर, डॉ. एन. बी. बनसोडे, डॉ. दीपक भालेघरे, डॉ. सचिन भोसले, डॉ. सुयोग दांडेकर, डॉ. प्रेरणा ढोबळे- त्रिगुणे, डॉ. रोहित दीक्षित, डॉ. प्रमोद गावडे, डॉ. राजकुमार घाडगे, डॉ. निशांत गावकर, डॉ. प्रतापराव गोळे, डॉ. राजेंद्र गोसावी व डॉ. शीतल गोसावी, डॉ. संदीप जाधव, सुनीता जाजू व डॉ. सुरभी जाजू, डॉ. अण्णासाहेब कदम, डॉ. नितीन कदम, शिवाजी कदम, डॉ. रमेश लोखंडे, डॉ. मीरा मगर, डॉ. सी. व्‍ही. महाजन, डॉ. महेश मेणबुदले, डॉ. वैभव मिरजकर, डॉ. संतोष मोरे, डॉ. आनंद ओक, डॉ. अनिल पाटील, डॉ. भूषण पाटील, डॉ. नितीन रोकडे, डॉ. सचिन साळुंखे व डॉ. प्रणाली साळुंखे, डॉ. उमेश साळुंखे, डॉ. कमलेश शहा, रामसिंग, डॉ. कैलास विभूते, डॉ. सुनील यादव, श्री गौरीशंकर डायग्नॉस्टिक ॲण्ड रिसर्च सेंटर प्रा. लि.

कोविड संकटात डॉक्टरांनी दिला यशस्वी लढा - जयवंशी

सातारा - प्रशासकीय सेवेत गडचिरोली, वाशीम, हिंगोली, गोंदिया या दुर्गम भागांत काम करताना अनेकदा डॉक्टरांची कमतरता असल्याचे जाणवले. त्या ठिकाणी डॉक्टर हा समाजासाठी किती महत्त्वाचा घटक आहे, याची प्रकर्षाने जाणीव झाली. दोन वर्षांपूर्वी जगभरातील लोकांवर आलेल्या कोविडच्या संकटात डॉक्टरांनी एकत्र येत नागरिकांचा जीव वाचवीत कोविडशी यशस्वी लढा दिल्याचे सांगत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.

पत्रकारितेबरोबर समाजहिताचा वसा जपण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात ‘सकाळ’ कायमच अग्रेसर असतो. त्याचाच एक भाग म्हणून ‘सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार सोहळा देविका लॉन्स येथे आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर, जिल्हाधिकारी जयवंशी उपस्थित होते. या वेळी श्री. जयवंशी बोलत होते.

जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, ‘दुर्गम भागात काम करताना डॉक्टर प्रकाश आमटे हे आदिवासी व इतर नागरिकांवर जंगलांमध्ये अतिशय खडतर परिस्थितीत उपचार करतात. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविडच्या काळात समाजातील महत्त्वाचा घटक असणारा डॉक्टर देवदूतासारखा धावून आला. त्यामुळे समाजाला पुन्हा जगण्याची आशा देणाऱ्या डॉक्टरांचा सकाळ माध्यम समूह सन्मान करत असल्याने अतिशय आनंद होत आहे.’