
जागतिक बाजारपेठेतील अतिरिक्त साखरेच्या साठ्याचा अंदाज ६१ लाख टनांहून ४१ लाख टनांवर घसरला आहे. परिणामी जागतिक बाजारात साखरेचे दर वाढले.
Sugar : जागतिक बाजारात साखर प्रतिटन ५८१ डॉलरवर
सोमेश्वरनगर (जि. पुणे) - जागतिक बाजारपेठेतील अतिरिक्त साखरेच्या साठ्याचा अंदाज ६१ लाख टनांहून ४१ लाख टनांवर घसरला आहे. परिणामी जागतिक बाजारात साखरेचे दर वाढले असून, शनिवारी हा दर ५८१ डॉलर प्रतिटनावर पोचला. परंतु दुसरीकडे देशांतर्गत साखरेचे उत्पादनही घटल्यामुळे निर्यातीची शक्यता कमीच आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेची गरज आता तब्बल १७६२ लाख टनांवर पोचली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये १८२१ लाख टन साखरनिर्मिती होईल, असा अंदाज होता. परंतु १८०४ लाख टनच साखर निर्मिती होईल, असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय साखर संघाने व्यक्त केला आहे. भारतात ३४५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज ३३४ लाख टनांवर आला आहे. तर, ब्राझीलचे इथेनॉलवर भर देण्याचे धोरण आहे. त्यामुळे याआधी ६१ लाख टन अतिरिक्त साखरेचा अंदाजही घसरला आहे. केवळ ४१ लाख टन साखर अतिरिक्त असेल, ही बाब स्पष्ट झाली आहे.
अतिरिक्त साठा जगाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. याशिवाय अनेक देशांची आयातीची गरज वाढतच आहे. त्यामुळे जागतिक बाजारात साखरेचे भाव समाधानकारक आहेत. भारताने पहिल्या टप्प्यात ६० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला होता. आढावा घेऊनच दुसऱ्या टप्प्यातील निर्यातीचा निर्णय होणार होता.
मात्र, देशांतर्गत उत्पादन घटल्याचे कारण पुढे केल्यामुळे निर्यातीचा दुसरा टप्पा बारगळण्याची चिन्हे आहेत. लंडन बाजारात साखरेला २४ फेब्रुवारीला ५६९ डॉलर प्रतिटन दर होता. २ मार्चला तो ५७४.६० डॉलर प्रतिटन झाला. तर शनिवारी ५८१.१० डॉलर प्रतिटनावर पोचला. न्यूयॉर्क बाजारात २०.६१ सेंट अशा दर होता. ६ फेब्रुवारीला ५५० डॉलर प्रतिटन असा दर मिळत होता. केंद्र सरकारने साखरेच्या १५ ते २० लाख टनांच्या निर्यातीचा निर्णय घेतला तर या जागतिक स्थितीचा फायदा होऊ शकतो. देशांतर्गत साखरेचे दरही ३१०० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल या नीचांकी पातळीवर आहेत. त्यात वाढ होण्यासाठी मदत झाली असती.
भारतीय साखरेस निर्यातीची संधी मिळाली असती तर ४ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिकचा दर सहज मिळू शकला असता. देशातील साखर उत्पादनाची आकडेवारी पाहता निर्यातीस संधी दिली जाणार नाही. मात्र, जागतिक दरवाढीच्या या स्थितीचा भारतीय साखर उद्योगाला पुढील हंगामासाठी उपयोग होईल.
- राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्वर साखर कारखाना