
‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘प्रीमियर’ हे मनोरंजन विश्वाला वाहिलेले मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक आहे. मनोरंजन क्षेत्रातील इत्यंभूत माहिती देणारे हे मासिक कमालीचे वाचकप्रिय ठरले आहे.
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टी सध्या वेगळ्याच तेजाने लखलखते आहे. अनेक सकस आणि दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे. ही उत्तम कामगिरी करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार व तंत्रज्ञ यांच्याबरोबरच निर्माते व दिग्दर्शक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी, त्यांना असेच उत्तम काम करण्याची प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रीमियर’ या मनोरंजन विश्वाला वाहिलेल्या मासिकातर्फे ‘सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड्स २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे हे दुसरे पुष्प असून, हा सोहळा या वेळी पुण्यात हडपसरमधील ‘ॲमनोरा-द फर्न हॉटेल्स ॲण्ड क्लब’ येथे २६ डिसेंबर रोजी सायंकाळी होणार आहे.
या रंगारंग सोहळ्यात पुरस्कार मिळविण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी प्रवेश अर्ज पाठविणे आवश्यक आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’चे ‘प्रीमियर’ हे मनोरंजन विश्वाला वाहिलेले मराठीतील एकमेव ग्लॅमरस मासिक आहे. मनोरंजन क्षेत्रातील इत्यंभूत माहिती देणारे हे मासिक कमालीचे वाचकप्रिय ठरले आहे. रसिकांच्या मनात या मासिकाने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रुपेरी पडद्यावरील चमचमत्या तारे-तारकांची माहिती देण्याबरोबरच पडद्यामागील तंत्रज्ञांची व्यथा आणि कथा सांगणारे तसेच त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हे मासिक आहे. यामुळेच हे मासिक रसिकमान्य ठरले आहे. मनोरंजन विश्वातील मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्याला कलाकारांची मांदियाळी असेलच शिवाय अन्य क्षेत्रातील मान्यवर मंडळीही यासाठी खास उपस्थित राहतील. या वेळी मनोरंजनाचा धमाकेदार कार्यक्रमही असणार आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा विविध विभागांमध्ये हे पुरस्कार देण्यात येणार असून, त्याकरिता विहित नमुन्यात प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. ते लवकरात लवकर भरून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत प्रवेश अर्ज
‘सकाळ प्रीमियर अॅवॉर्ड्स’साठी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत सेन्सॉरची मंजुरी मिळालेल्या किंवा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात येणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी चित्रपटांचे परीक्षण करणार आहेत. या पुरस्कारासाठीचे प्रवेश अर्ज http://esakal.in/premier येथे उपलब्ध असून, त्यासाठीच्या आवश्यक सूचनाही तेथे आहेत. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी ९१३७९७६१५० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.