संभाजी बिडीचं नाव बदललं, नवा ब्रँड बाजरात! रोहित पवारांची ट्विटद्वारे माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

या नावावर आक्षेप घेत शिव व शंभूप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार पवार यांना व्यवस्थापनाने नाव बदलाबाबत आश्वासन दिलं होतं. त्यानुसार कंपनीने कार्यवाही केली आहे.

अहमदनगर ः छत्रपती घराण्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला अभिमान आहे. तो आस्थेचा विषय असल्याने सर्वांचेच त्याकडे लक्ष असते. संभाजी बिडी नावाने प्रसिद्ध असलेल्या कंपनीवर लोकांचा आणि शिवप्रेमींचा रोष होता. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही हा विषय कंपनी व्यवस्थापनाच्या कानावर घातला होता.

या नावावर आक्षेप घेत शिव व शंभूप्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आमदार पवार यांना कंपनी व्यवस्थापनाने नाव बदलाबाबत आश्वासन दिलं होतं. त्यानुसार कंपनीने कार्यवाही केली आहे. त्याचं सोशल मीडियातून स्वागतही होत आहे.

 

साबळे वाघीरे आणि कंपनीचा संभाजी बिडी हा ब्रँड होता. सन १९३२पासून ही कंपनी बिडीचे उत्पादन करते. १९५८पासून संभाजी बिडी नावाचा ब्रँड होता. मात्र, संभाजी महाराज हे आराध्य दैवत असल्याने बिडीला त्यांचे नाव नको, असे अनेकांचे मत होते. त्या भावनेचा आदर करून कंपनीने त्यांचे नाव काढून टाकले आहे. साबळे बिडी या ब्रँडने ती आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल, या बाबतची माहिती आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.

साबळे वाघीरे आणि कंपनीने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. हा लोकभावनेचा आदर आहे. त्याबद्दल कंपनी व्यवस्थापनाचे आभार, अशा आशयाचे रोहित पवार यांचे ट्विट आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Bidi's name changed Rohit Pawar's information via tweet