संभाजीराजे म्हणतात, आरक्षण गेले खड्ड्यात!

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 22 जून 2019

मोफत शिक्षण हाही हक्क
मराठ्यांचे आरक्षण न्यायालयात, मुस्लिम धनगराच्या आरक्षणाबाबत स्पष्टता नाही, अशा परिस्थितीत ९४ टक्के गुण मिळवूनही एखाद्या विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागत असेल, तर ‘आरक्षण गेले खड्ड्यात’ ही उद्वेगाची भावना मी व्यक्त केली, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘आरक्षण हा जरूर हक्क आहे. पण मोफत शिक्षण हाही हक्क आहे. शाहू महाराजांनी तो हक्क जनतेला दिला. पदवीपर्यंत किंवा निदान बारावीपर्यंत सर्वांना मोफत शिक्षण हा आग्रह आता मी धरला आहे. शिक्षण मोफत झाले, शिक्षणाचा खर्च कमी झाला तर नैराश्‍याची भावना जरूर कमी होईल.’

कोल्हापूर - दहावीच्या परीक्षेला तब्बल ९४ टक्के गुण मिळूनही हव्या त्या शाखेला प्रवेश न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील देवळाली येथील अक्षय शहाजी देवकर या विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येवरून खासदार संभाजीराजे छत्रपती चांगलेच संतप्त झाले आहेत. केवळ आरक्षण नसल्याने या मुलाने आत्महत्या केली असेल तर खड्ड्यात गेले आरक्षण पहिल्यांदा पदवीपर्यंतचे शिक्षण सर्वांना मोफत करा, अशी मागणीही त्यांनी ट्‌विटद्वारे केली आहे. संभाजीराजे यांच्या संतप्त प्रतिक्रियेचे पडसाद उमटत आहेत.

‘‘अक्षय देवकर याने आत्महत्या केली, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. केवळ पुढाऱ्यांनीच नाही, तर अधिकाऱ्यांनीही याचे आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मी या सरकारवर किंवा पूर्वीच्या सरकारवर टीका करत नाही. या मुलाने आत्महत्या का केली, याची आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले होते. इतर समाजालाही आरक्षण दिले, मराठा समाजाला आरक्षण मिळते का ? याचा विचार व्हावा. त्या वेळी महाराजांनी शिक्षण सक्तीचे व मोफत केले होते.

आज आपण शिक्षण मोफत का देऊ शकत नाही. आज आठवीपर्यंत मोफत शिक्षण आहे, पण त्याने काही होणार नाही. शिक्षण क्षेत्रातील खासगीकरणामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद पडत आहेत. सगळ्याच मुलांना मोफत शिक्षण द्यावे, पदवीपर्यंत नसेल तर १२ वीपर्यंत तरी मोफत शिक्षण व्हावे,’’ असे संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

‘‘शेतकऱ्यांच्या देठालाही कोणी हात लावायचा नाही, असे आदेश शिवाजी महाराजांनी आपल्या काळातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज अधिकारी किती माजले आहेत, सगळेच माजलेले नाहीत. पण अशा अधिकाऱ्यांनीही याचा विचार करण्याची गरज आहे. सरकारमधील नेते असोत किंवा विरोधक ‘योग’ करत आपण दोन मिनिटे शांत बसून विचार करू, की का म्हणून आपण राजकारणात आहोत. आपल्याला नेमके काय मिळवायचे आहे ?

भाषणात बोलताना देशहित, समाजहिताच्या गोष्टी आपण करत असतो. परंतु, वास्तवात आपलं आचरण त्याप्रकारचे आहे का ? की उगाच ‘मुंह में राम, बगल में सुरी’ असा प्रकार चालू आहे. नाहीतरी आज एवढा हुशार बालक आत्महत्येला प्रवृत्त होतोच कसा ? त्याच्या आयुष्याची ही खरी तर सुरवात होती,’’ असेही यात म्हटले आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. ज्यांच्यामुळे या राष्ट्राचे भविष्य सुरक्षित राहील ते युवक व ज्यांच्यामुळे आपले जिवंत असणे सुरक्षित आहे ते शेतकरी ह्या सर्वांना असुरक्षित का वाटतंय ? का म्हणून ते स्वतःला संपवत आहेत ? असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. 

मला वाटतेय की आपल्या व्यवस्थेतच दोष आहे. मराठा, मुस्लिम, धनगर आरक्षणाचे प्रश्‍न का मार्गी लागत नाहीत ? शेतकऱ्यांच्या बांधावर स्वातंत्र्यानंतरही इतकी वर्षे पाणी का गेलं नाही ? मालाला योग्य बाजारभाव का मिळत नाही ? असे अनेक प्रश्‍न आज आवासून उभे आहेत. यात नेत्यांसोबत प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे, असेही संभाजीराजे यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sambhaji Raje Chatrapati Talking on Maratha Reservation Issue