
सन्मानासाठीच जागा देत होतो - संजय राऊत
मुंबई : शाहू घराण्याचा सन्मान राखण्याच्या हेतूनेच संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या कोट्यातली जागा देण्याची तयारी शिवसेनेने केली होती, असे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचे विषय आमच्यासाठी संपल्याचे स्पष्ट केले. उद्या (ता. २६) विधानभवनात दुपारी १ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
राज्यसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांचे समर्थक व काही मराठा संघटनांमध्ये नाराजी आहे. संजय पवार यांना मराठा महासंघाचे कार्यकर्ते म्हणून उमेदवारी दिली आहे. शिवसेनेला इशारे देणाऱ्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी खडे बोल सुनावले आहेत. राऊत म्हणाले, शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्याचा आणि संभाजीराजेंच्या अपमानाचा काहीही संबंध नाही. संभाजीराजे यांना शिवसेनेच्या कोट्यातून जागा द्यायला आम्ही तयार झालो होतो. त्यांचा आणि घराण्याचा सन्मान राखण्याचाच हेतू यामागे होता. यापेक्षा शिवसेना काय करू शकते?
राजघराण्यातील व्यक्तीला राजकीय पक्षांचे वावडे असण्याचे कारण नाही. याआधी शाहू महाराज सीनियर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मालोजीराजे भोसले राष्ट्रवादीचे आमदार होते. स्वत: संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा लढली होती.
- संजय राऊत, शिवसेना नेते
Web Title: Sambhaji Raje Shiv Sena Honor Seat Sanjay Raut Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..