Sambhajiraje I संभाजीराजे छत्रपतींची राजकीय कारकीर्द सांगते; 'त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sambhajiraje

सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव राजकीय पटलावर चांगलेच गाजले आहे.

संभाजीराजे छत्रपतींची राजकीय कारकीर्द सांगते; 'त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही'

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. संभाजीराजे छत्रपती यांचा खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असणार आहे याकडे संपर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. १२ मे रोजी त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत जुलै महिन्यात होणारी राज्यसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार असून स्वराज्य संघटनेची स्थापना केली असल्याची घोषणा केली. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून यापैकी पाच जागांवर भाजप आणि महाविकास आघाडीचे खासदार निवडून येतील. सहाव्या जागेवर निवडून जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले होते. (Sambhajiraje Chhatrapati Political History)

सध्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे नाव राजकीय पटलावर चांगलेच गाजले आहे. मागील दोन दिवसांपासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात सातत्याने घडमोडी घडत आहेत. या निवडणुकीच्या केंद्रस्थान कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती असून त्यांची राजकीय वाटचाल या निवडणुकीवर अवलंबून आहे. त्यांची राजकीय कारर्कीद आणि जनतेसाठी केलेली कामे यांचा मांडलेला हा लेखाजोखा..

हेही वाचा: 'व्हत्याच नव्हतं अन् नव्हत्याच व्हतं, पवारांच्या नादला लागू नका'

कोल्हापूर संस्थानाची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमंत शाहू महाराज यांचे संभाजीराजे हे पुत्र आहेत. 11 फेब्रुवारी 1971 रोजी संभाजीराजेंचा जन्म झाला. कोल्हापूर आणि राजकोट येथून त्यांनी शिक्षण घेतले. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र यात त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर 2016 साली भाजपच्या शिफारशीवरून राज्यसभेवर त्यांची राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. राज्यसभेवर जाणारे ते कोल्हापूरचे पहिले खासदार ठरले. यानंतर अनेक कामे करत त्यांनी गड-किल्ल्यांसाठी महत्वाचं योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या या कामाची दखल राजकारणातही घेतली जाते.

२०१६ पासून औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनासाठी ठिणगी पडली आणि संभाजीराजे यांचे नाव राजकीय पटलावर उमटू लागले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाची मागणी खूप जुनी आहे. यात आधीपासून संभाजीराजे सक्रिय होते. आरक्षणासाठी २००७ पासून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. २०१३ साली त्यांच्या नेतृत्वात मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र त्या अहवालाचा काहीही मागमूस लागला नाही. त्यानंतर राणे समितीनं दिलेलं आरक्षणही टिकलं नाही. त्यावेळी या मुद्द्यावरून राजेंनी मंत्री, मुख्यमंत्र्याशी चर्चा केली होती. पुढे त्यांनी २०१३ आणि २०१४ या साली शिवशाहू यात्रा काढली. यामार्फत राजेंनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला होता.

हेही वाचा: '...हे तर होणारच होतं, भूमिका बदलली नाही ते शरद पवार कसले?'

छत्रपती घराण्यातील वंशज आणि राज्यसेभीतली खासदर म्हणून त्यांच्या पाठीमागे एक मोठा जनसमुदाय आजही उभा आहे. संयमी आणि अभ्यासून वृत्तीचे संभाजीराजे वेळ पडल्यास आक्रमक पवित्रा घेऊ शकतात हे आजवरच्या अनेक भाषणांमधून दिसून आले आहे. रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. तब्बल १५ वर्षांपासून ते रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करत आहेत. यासाठी हजारो शिवप्रेमी येतात. रायगडशी संबंधित अनेक उपक्रमांशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले असल्याने शिवप्रेमींच्या मनात संभाजीराजेंना आदराचे स्थान आहे.

राज्यसभा अपक्ष लढवणार या संभाजीराजेंच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांनी आमचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत त्यांना देऊ असं शरद पवार म्हणाले. यानंतर पवारांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केले. राज्यसभेच्या जागेसंदर्भात आमच्या पक्षापुरता निर्णय झाला आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुका झाल्या तेव्हा आमची एकच जागा निवडून येत होती. त्यावेळी दुसरी जागा निवडून आणण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केल्यामुळे मी आणि फौजिया खान राज्यसभेवर निवडून गेलो होतो. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक मते शिवसेना उमेदवाराशिवाय दुसऱ्या कोणाला देता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा: 'हिंदू धर्माला मजबूत करण्याचं काम सेनेपेक्षा भाजप अधिक करत'

याशिवाय शिवसेनेने संभाजीराजेंचा पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी पक्षप्रवेशाची अट घातली. संभाजीराजेंची मात्र ही ऑफर धुडकावून लावली. आता शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणीही असेल तरी अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली आहे. मातोश्रीवर येऊन शिवबंधन बांधा आणि पठिंबा मिळवा, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी पाठवला आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत संभाजीराजेंना वेळ देण्यात आली आहे. संभाजीराजेंनी ही ऑफर अद्याप स्वीकारलेली नाही. त्यातच आता संभाजीराजे सकाळीच कोल्हापूरकडे रवाना झाले असल्याने आता आणखी राजकारण तापणार आहे. त्यामुळे संभाजीराजेंचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे.

Web Title: Sambhajiraje Chhatrapati Political History And Rajya Sabha Election 2022 Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top