महाराष्ट्रातील समृद्धी शेडगेची "इस्त्रो'त चमक

सुनील शेडगे
Monday, 12 October 2020

समृद्धीची यशामुळे रयत शिक्षण संस्थेच्या लौकिकात पडली आहे. भरतगाव ग्रामस्थ तसेच विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. 

नागठाणे (जि. सातारा) : आकांक्षा असेल तर त्यापुढे गगनही ठेंगणे ठरते, या वाक्‍याचा प्रत्यय देताना सातारा तालुक्‍यातील भरतगाव येथील एका कन्येने"इस्त्रो'च्या (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) स्पर्धेत आपली चमक दाखविली आहे. "इस्त्रो'तर्फे आयोजित आव्हानात्मक स्पर्धेत तिने देशभरातील लाखो स्पर्धकांतून 11 वा क्रमांक पटकावला आहे. 

समृद्धी सत्यनारायण शेडगे हे या कन्येचे नाव. तिचे वडील माध्यमात कार्यरत असतात. आई भरतगाव येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. समृद्धी ही बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीची. आजवर विविध स्पर्धांत तिने यश पटकावले आहे. अलीकडच्या काळात ती उत्तम लेखनही करू लागली आहे. समृद्धी सध्या सातारा येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये बारावीच्या इयत्तेत शिकते. "इस्त्रो' या संस्थेने नुकत्याच आयोजिलेल्या सायबर टेस्ट कॉम्पिटीशनमध्ये समृद्धी सहभागी झाली. या स्पर्धेत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई या महानगरांसह देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. देशातील लाखो स्पर्धकांतून केवळ दोन हजार 298 जणांचीच अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातून 156 स्पर्धक यशस्वी ठरले.

इंजिनिअरिंगला प्रवेश घेणे झाले सोपे ; दीड लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा 

समृद्धीने देशात 11 वा क्रमांक मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले. या सायबर टेस्ट कॉम्पिटिशनमध्ये येत्या दोन दशकांत अंतराळातील कोणती आव्हाने असू शकतील, हा विषय देण्यात आला होता. हिंदी भाषेतील ही स्पर्धा स्पर्धकांसाठी मोठे आव्हान होती. त्या कसोटीवर उतरत समृद्धीने आपले वेगळेपण सिद्ध केले. तिच्या या यशामुळे रयत शिक्षण संस्थेच्या लौकिकात पडली आहे. भरतगाव ग्रामस्थ तसेच विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. 
 

""भरतगावसारख्या छोट्या गावातून समृद्धीने कमावलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. पालक म्हणून तिच्या या यशाचा विशेष अभिमान वाटतो.'' 

- सत्यनारायण शेडगे, भरतगाव, ता. सातारा 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samruddhi Shedge Of Maharashtra Bagged 11th Place In Isro Cyber Test Competition Satara News