जिल्हा बँक झाँकी, मोठा पल्ला बाकी; मिरजेत काँग्रेसचीच बाजी,राष्ट्रवादीचाही पासंग वाढला : Sangli Bank Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

District bank Election

मिरज सोसायटी गटात विशाल पाटील यांना घेरण्याचा डाव आखला गेला होता. त्यामागे खासदार संजय पाटील यांची यंत्रणा कामाला लागली होती. विशाल यांनी सावधपणे तो चक्रव्यूह बांधणी होण्याआधीच भेदला.

जिल्हा बँक झाँकी, मोठा पल्ला बाकी; मिरजेत काँग्रेसचीच बाजी

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मिरज तालुक्यातून चार संचालक विजयी झाले. चारही सांगली, मिरज (Sangli,Miraj)विधानसभा मतदार संघात आमदार व्हायला इच्छुक आहेत. पैकी विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, श्रीमती जयश्री पाटील( Vishal Patil, Prithviraj Patil, Mrs.Jayshree Patil) तिघेही काँग्रेसमधील आहेत आणि सांगली विधानसभेची उमेदवारी मिळवताना त्यांच्यात झुंज अटळ आहे.

त्यांनी जिल्हा बँकेत बाजी मारली, आता गट बांधायला, वाढवायला, मजबूत करायला बँकेचे मैदान उपयोगी ठरेल. बाळासाहेब होनमोरे मिरजेतून लढत आले आहेत, बँकेचा गुलाल दुसऱ्यांदा लागला, आता विधानसभेचा लागावा, ही त्यांची मनिषा आहे. यानिमित्ताने पालकमंत्री जयंत पाटील यांनी मिरज तालुक्यातील आपला पासंग अधिक मजबूत केला, हे अधिक ठळकपणे नमूद करावे लागेल.

हेही वाचा: 100 कोटीची आॅफर नाकारली पण, पक्ष सोडला नाही म्हणणारे दगडफेक करतायेतं...

मिरज सोसायटी गटात विशाल पाटील यांना घेरण्याचा डाव आखला गेला होता. त्यामागे खासदार संजय पाटील यांची यंत्रणा कामाला लागली होती. विशाल यांनी सावधपणे तो चक्रव्यूह बांधणी होण्याआधीच भेदला. त्यामुळे संजयकाका विरुद्ध विशाल हा संघर्ष रंगत आणणारा ठरला नाही. विशाल यांनी सावध खेळी केली आणि हक्कांचे ५२ मतदार नियंत्रणात ठेवले. तरीही, उमेश पाटील यांनी १६ मते घेत कार्यकर्ता लढू शकतो, असा संदेश दिला. या प्रचारात विशाल यांनी जयंत पाटील आणि विश्‍वजीत कदम यांच्याशी जुळवून घेणारी; त्यांचे नेतृत्व मान्य करून पुढे जाण्याचा मार्ग सुकर करणारी भाषा वापरली, हेही अधोरेखित केले पाहिजे.

पृथ्वीराज पाटील अडचणीत आहेत, मागे पडलेत, असे सतत सांगितले गेले. तेच पृथ्वीराज चौघांत सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले. त्यांना मिळालेल्या मतांत सर्वाधिक वाटा वाळवा तालुक्याचा आहे आणि ते प्रभावक्षेत्र जयंत पाटील यांचे आहे... याहून अधिक जास्त सांगण्याची गरज नाही. पृथ्वीराज पाटील हे सांगली विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत प्रभावी कामगिरी करून पुढे आले आहेत. या विजयाने त्यांचे आत्मबळ नक्कीच वाढले आहे आणि जयंतरावांनी डोक्यावर हात ठेवल्याने ‘आपण शर्यतीत पुढे राहू’, असा आत्मविश्‍वासही दुणावला असणार आहे.

श्रीमती जयश्री पाटील यांच्यासाठी आणि मदनभाऊ समर्थकांसाठी हा विजय भलताच सुखावणारा ठरला आहे. विष्णूअण्णा भवनवर खूप वर्षानंतर गुलाल उधळला गेला. जयश्रीताई काँग्रेसच्या नेत्या आहेत, मदनभाऊंचा गट त्यांनी बांधून ठेवला आहे, त्यांनी विधानसभा लढवावी, असे कार्यकर्त्यांना वाटतेय, ते त्यांनाही वाटेल, असे चित्र जिल्हा बँकेच्या मतदानातून, त्यांना मिळालेल्या प्रतिसादातून आणि त्यांच्यासाठी कामाला लागलेल्या यंत्रणेतून दिसून आले. जयश्रीताईंची उमेदवारी केवळ काँग्रेसची नव्हती तर त्यातही जयंत पाटील यांचा वाटा होता आणि तो निर्णायक असल्याचे मतदानाची आकडेवारी सांगते. त्यामुळे वर नमूद तीनही नेत्यांना पुढचा मार्ग जिल्हा बँकेतून जातो, याची खात्री पटली आहे. लोक आमदार होऊन जिल्हा बँकेत येतात आणि या तिघांनाही जिल्हा बँकेतून आमदार व्हायचे आहे.

मिरजकर बाळासाहेब होनमोरे यांनी जिल्हा बँकेच्या जल्लोषात मिरज विधानसभेचा बिगूल वाजवला आहे. त्यांना सलग तीन पराभव पचवावे लागले. त्यामुळे त्यांच्याच पक्षातून आता ‘पर्याय’ म्हणून काही चेहरे पुढे येत आहेत. त्यांना थोपवण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न दिसला. या घडामोडींत गेल्या वर्षभरात जयंत पाटील आणि राष्ट्रवादीने ज्या गतीने मिरज तालुक्यात नेटवर्क वाढवले आहे, त्याची प्रचिती यानिमित्ताने आली. जिल्हा बँकेत काँग्रेसचे तीन लोक विजयी झाले असले तरी बेरजेत राष्ट्रवादी अधिक होत निघाली आहे, याचेही दर्शन घडले. ही काँग्रेससाठी चिंतेची बाब नक्कीच आहे. कारण, जिल्हा बँकेचे मैदान छोटे होते, उद्देश एकच होता, तिघांनाही राष्ट्रवादीने हात दिला. विधानसभेचे मैदान वेगळे आहे. जिल्हा बँक झाँकी असली तरी चारही इच्छुकांसाठी खूप पल्ला बाकी आहे.

loading image
go to top