
हिंदूत्वाचे धडे देणाऱ्या मास्तरांची डिग्री तपासा, राऊतांचा राज ठाकरेंना टोला
मुंबई : राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यांवरून (Loudspeaker Controversy) राजकारण तापलं आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांना नवीन आदेश जारी केले आहेत. पण, राज ठाकरेंचे वक्तव्य बकवास आहेत. सर्व भोंगे बंद करा म्हणजे काय? मंदिरांवरील भोंगे करायचे आहेत का? राज ठाकरेंनी डोकं ठिकाणावर ठेवून वक्तव्य करावीत. या राज्यात सर्वधर्मियांचे कार्यक्रम होत असतात. तुम्हाला हिंदूत्वाचे धडे देणाऱ्या मास्तरांची डिग्री तपासून घ्या. त्यांची डिग्री बोगस आहे का? ते तुम्हाला चुकीचे धडे देत आहेत. शिवसेनेला कोणीही हिंदूत्व शिकवू नये, असा सवाल करत संजय राऊतांनी राज ठाकरेंसह फडणवीसांना टोला लगावला. (Sanjay Raut Criticize Raj Thackeray)
हेही वाचा: नवनीत राणांचा आजार बळावला, जे जे रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात भोंग्याच्या बाबतीत कुठेही कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही. देशात भोंग्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम केलं जातं. कोणी भोंग्यांचा बेकायदेशीर वापर करत असेल तर त्यावर कारवाई करण्यास सरकार सक्षम आहे. भोंग्यांच्या विषयावर आंदोलन करावं, अशी परिस्थिती बिघडली नाही. मुंबईत मशिदीवरील भोंग्यांसाठी सर्वांकडे परवानगी आहे. त्यांनी डेसिबल कमी ठेवण्याचे देखील मान्य केले आहे. मंदिर, चर्च आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम करणाऱ्यांना देखील हाच नियम आहे. प्रत्येकानं आपआपल्या पद्धतीनं नियमांचं पालन केलं, तर न्यायालयाचा मान राखला जाईल. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत नसेल तर समान नागरी कायद्याची भाषणा कशाला करता? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
प्रत्येकानं धर्माच्या पलिकडे जाऊन न्यायालयाचा आदेश पाळायला पाहिजे. धर्माच्या वर न्यायालय आणि कायदा आहे. कोणीतरी चिथावणीखोर भाषण करत असेल तर ते समान नागरी कायद्याचं उल्लंघन आहे. राज्यात राजकीय फायद्यासाठी चिथावणीखोर भाषण करत असेल तर पंतप्रधान मोदींनी याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे, असंही राऊत म्हणाले. शिवसेनेला आंदोलनाचा सर्वाधिक अनुभव आहे. आंदोलन कशाप्रकारे करावी हे शिवसेनेकडून शिकावी. फक्त प्रसिद्धीसाठी आंदोलन करू नये. आम्ही सत्तेत असलो तरी आंदोलनाशी आमचा संबंध कायम आहे. महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार आहे. मुख्यमंत्रीपदी बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांबाबत काय निर्णय घ्यायचे याचे सल्ले दुसऱ्यांकडून घ्यायची गरज नाही, असं संजय राऊत म्हणाले.
''...आम्ही बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट पाठवू'' -
राज ठाकरेंनी आज सकाळीच बाळासाहेबांचा एक व्हिडिओ ट्विट केला. त्यावर देखील राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार आम्हाला सांगू नका. आजही आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारावर चालतो. तुम्ही आम्हाला सांगू नका. बाळासाहेबांनी रस्त्यावरची नमाज बंद केली होती. बाळासाहेब सांगत होते त्याप्रमाणे मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे बंद झालेत. त्यानंतर न्यायालयाकडून सर्व देशासाठी एकच निर्णय झाला. हा इतिहास कोणाला माहिती नसेल तर आम्ही त्यांना बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट पाठवतो, असंही संजय राऊत राज ठाकरेंना म्हणाले.
Web Title: Sanjay Raut Attack On Raj Thackeray Over Hinduism And Louspeaker Issue
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..