
Shivsena: 'तुमची पापं लपवण्यासाठी आमच्या...' शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या व्हिडिओ व्हायरल प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील 'मातोश्री' नावाच्या पेजबाबत तक्रार केली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून या प्रकरणात ठाकरे गटाचा हात असल्याचा आरोप केला आहे.
याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला आपल्या भाषेत उत्तर दिलं आहे. इतकेच नव्हे तर संबंधित व्हिडिओत तथ्य आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी शीतल म्हात्रे यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. ते आज सकाळी (सोमवारी) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मला या व्हिडिओबाबत काहीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. आज सकाळी असा काही व्हिडिओ आहे, ही गोष्ट माझ्या वाचनात आली. पण या व्हिडिओशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संबंध नाही. तुमची पापं लपवण्यासाठी, गुन्हे लपवण्यासाठी, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवर हात टाकणार असाल तर ते कायद्याचं राज्य नाही. कोणीही व्हिडिओ काढून व्हायरलं करतं, याचा आमच्याशी संबंध नाही. पण सार्वजनिक कार्यक्रमात कोणीही अशाप्रकारचं अश्लील वर्तन करत असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजेत असं संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.
तर पुढे राऊत म्हणाले कि, व्हिडिओ खरा की खोटा याचाही तपास करा. तो व्हिडिओ खरा असेल तर सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करुन समाजात चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्याचा तर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तर संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर शिंदे गट आणि शीतल म्हात्रेंकडून काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा शोध सुरु केला. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी काल रात्री कल्याणच्या कोळशेवाडी परिसरातून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. सध्या पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे. हा तरुण ठाकरे गटाच्या सोशल मीडिया सेलचं काम पाहतो. शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.