
Maharashtra Politics : "बरं…मग आम्ही सुद्धा ४० गद्दार आमदारांना…"; हक्कभंग कारवाईवरून राऊतांनी CM शिंदेंना डिवचलं
खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोर मंडळ म्हटल्यानंतर त्यांच्याविरोधात हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली. यानंतर विरोधकांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी केलेल्या एका विधानावरून हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. यावरून एकंदरीतच राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी आज सभागृहामध्ये आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी देशद्रोह्याला देशद्रोही बोलणं हे चुकीचं असेल तर मी ५० वेळा ती चूक करेन असं सभागृहातच ठणकाऊन सांगितेल. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे.
राऊतांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "बरं….मग आम्ही सुद्धा 40 गद्दार आमदारांना विधिमंडळातले चोर मंडळ म्हणालो.. स्पष्ट आहे. जय महाराष्ट्र!" असं ट्वीट केलं आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला होता. याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं असं म्हणत टीका केली.
यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री मला देशद्रोही म्हणाले असा आरोप केला. तसेच मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणण्याची मागणी केली होती. यावर आज विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांच्या केलेल्या विधानाबद्दल खुलासा केला.
मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सदस्यांनी परिषदेत माझा विरोधात जो हक्कभंग आणला आहे. ते वक्तव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत नव्हते. नवाब मलिक यांचे संबंध देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींशी होते.
गोवावाला कंपाऊडच्या जमिनीवर मलिकांनी अवैध कब्जा घेतला. मलिक यांनी हसीना पारकर यांच्याकडून जमीन घेतली. ९३च्या बॉम्ब स्फोटातील आरोपीचाही यात सहभाग आहे. मलिक यांना ईडीकडून अटक झाली. NIA नेही चौकशी केली. मलिकांची प्रॉपर्टीही यात जप्त झाली आहे. त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. देशद्रोही नवाब मलिक यांचा मी उल्लेख केला. त्यांचे देशद्रोह्यासोबतचे संबंध समोर आलेले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले,"त्या मलिक यांचा राजीनामा यांनी घेतला नाही. त्यांना पाठिशी घातलं. त्यावेळी बरं झालं मी त्यांच्यासोबत चहापान टाळलं,असं मी बोललो. अंबादास दानवेजी तुम्हाला हे योग्य वाटतं का? देशद्रोह्यांना पाठीशी घातलं म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली. अजित दादांना मी देशद्रोही म्हटलो नाही. या वक्तव्याला राजकिय रंग देऊ नये. या देशद्रोह्याचं समर्थन आपण करता का? देशद्रोह्याला देशद्रोही बोलणं हे चुकीचं असेल तर मी ५० वेळा ती चूक करेन."