पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत

सुचिता रहाटे
शुक्रवार, 5 मे 2017

भारतीय जनता पक्षाची शिवसेनेबरोबर 25 वर्षांची युती होती. ती विचारांची युती होती. ती युती जर व्यवस्थित निभावली असती तर आनंद झाला असता. परंतू, भारतीय जनता पक्ष विसरला की एकहाती सत्ता येण्यासाठी शिवसेनेचे त्याग आणि कष्ट तितकेच मोलाचे आहेत.

मुंबई : ''देशात निर्माण झालेल्या आर्थिक आणि राजकीय लाटेत अनेक प्रादेशिक पक्ष टिकून राहू शकले नाहीत. महाराष्ट्रात शिवसेनेने आपली प्रतिष्ठा कायम राखली असून 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल'', असा ठाम विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. 2019 मधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळे पक्ष आत्तापासूनच मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनाही राज्यात 'भगवा' फडकविण्यासाठी जय्यत तयारीला लागली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी राजकारणातील आपल्या चाली खेळायला सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर 'सरकारनामा' सोबत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिलखुलास चर्चा केली.

''राज्यातील सध्याचे राजकारण 'अस्थिर' आहे. प्रत्येकाच्या मनात भीती आहे की सरकारचे काय होईल?, मध्यावधी निवडणुका लागतील का ? या चर्चेला अधूनमधून उधाण येतच असते. त्यामुळे प्रत्येक पक्ष 'अॅलर्ट' मोड'मध्ये आहे, तशी शिवसेना सुद्धा आहे. निवडणुका कधीही लागतील याचा काही नेम नाही परंतु आम्ही आमच्याकडून पूर्ण तयारीत आहोत. निवडणुकांना शिवसेना कधीच घाबरली नाही कारण त्याची आम्हाला सवय आहे. राहिला प्रश्न निवडून येण्याचा, जय-पराजय या राजकारणाच्या दोन बाजू असून प्रत्येकाच्या वाटेला ते येत असते परंतु ज्याच्या हातात एकहाती सत्ता असते त्यांना निवडणुका फार सोप्या जात असतात कारण संपूर्ण यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या हातात असते. त्यामुळे सत्तेत जरी असलो तरीही निवडणुकीची टक्कर मात्र सत्ताधाऱ्यांशीच आहे,'' असे संजय राऊत म्हणाले.

2019च्या निवडणुकीच्या मोर्चे बांधणीबाबत संजय राऊत म्हणाले, ''2019च्या निवडणुकीसाठी सगळेच पक्ष सज्ज झाले आहेत, त्यामध्ये शिवसेना कशी मागे राहील. आजवरच्या राजकारणात शिवसेना कधीही मागे नव्हती आणि ती कधीच मागे राहणार नाही. शिवसेना जरी सत्तेत आहे असे जरी असले तरी तो नुसता भास आहे. सत्ताधारी पक्षाकडून शिवसेनेला नेहमीच डावलले गेले आहे. आज आमच्याकडे सत्ता आहे परंतु आमच्या हातात एकहाती सत्ता नाही, आम्ही सत्तेत आहोत हे मीच काय उद्धव ठाकरे सुद्धा मानत नाहीत. त्यामुळे शिवसेनेला सत्ताधारी पक्षात धरू नका. शिवसेनेवर महाराष्ट्राच्या जनतेने भरपूर प्रेम केले आहे आणि करत राहणारच, जनतेच्या प्रेमामुळेच आज आम्ही इथवर आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत 'भगवा' फडकणारच आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल आमच्यासोबत असेल असा, आम्हाला विश्वास आहे.''

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचा वचक कुठेतरी कमी झाल्यासारखा दिसतो आहे? असे विचारल्यावर राऊत म्हणाले, ''वचक कमी झाला आहे असे म्हणता येणार नाही.मुंबईत सामाजिक व सांस्कृतिक परिस्थिती बदलली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये मराठी माणसाचे अस्तित्व कमी झाले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापन होताना गुजराती समाजाने हक्क सांगितला होता की, मुंबई केंद्रशासित ठेवा; मुंबई वेगळे राज्य करा; मुंबई गुजरातला द्या. हा प्रकार गेल्या वर्षांपासून आतापर्यंत सातत्याने सुरू आहे आणि या सगळ्यांशी टक्कर देत शिवसेना आतापर्यंत विजय मिळवत आहे. मुंबईतील इतर भाषिक वर्ग हा शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षाकडे वळल्याचे दिसून येते आणि त्यात तथ्य आहे. प्रत्येकजण आपापल्या प्रांताचा पक्ष आला की तिथे वळतो परंतु या परिस्थितीत सुद्धा मुंबईवर शिवसेना राज्य करत आहे. आर्थिक आणि राजकीय लाटेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 63 जागा जिंकल्या आणि शिवसेनेची प्रतिष्ठा कायम राखली. आमचा 'केजरीवाल', 'अकाली दल' किंवा 'मायावती' यांच्यासारखी अवस्था झालेली नाही.'' महाराष्ट्रावर शिवसेनेचा पगडा कायम राहील असेही, राऊत यांनी सांगितले.

'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला काही ठिकाणी यश मिळाले नाही, मात्र हा शिवसेनेचा पराभव आहे असे आम्ही मानत नाही तर काही प्रमाणात झालेल्या चुका आहेत असे मानतो. राजकारणातील जयपराजय शिवसेनेने पाहिले आहेत त्यामुळे 'तात्पुरते' विजय हे मिळतच असतात आणि त्यासाठी शिवसेनेच्या पोटात दुखण्याचे काहीही कारण नाही. सत्तेमुळे असलेल्या विजयाची जी 'सूज' असते, ती आम्ही पाहिलेली आहे. इंदिरा गांधी सुद्धा पराभूत झाल्या, जनता दल पक्ष नेस्तनाबूत झाला, व्ही. पी सिंग यांची राजवट आली आणि गेली, असे अपयश अनेक राजकीय पक्षांच्या वाटेला आले आहे त्यामुळे सत्तेत आलेल्यांनी हुरळून जाऊ नये,'' असाही टोला त्यांनी भाजपला लगावला.

ते पुढे म्हणाले, ''भारतीय जनता पक्षाची शिवसेनेबरोबर 25 वर्षांची युती होती. ती विचारांची युती होती. ती युती जर व्यवस्थित निभावली असती तर आनंद झाला असता. परंतू, भारतीय जनता पक्ष विसरला की एकहाती सत्ता येण्यासाठी शिवसेनेचे त्याग आणि कष्ट तितकेच मोलाचे आहेत. परंतू, भाजपने त्या त्यागाची किंमत ठेवली नाही आणि भाजपने युती तोडली,'' महाराष्ट्रात शिवसेनेचा 'पगडा' टिकून राहणार. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकहाती सत्ता शिवसेनेचीच येणार असा ठाम विश्‍वासही त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या राजकीय विश्वातील बित्तंबातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

Web Title: Sanjay Raut says Shiv Sena will form Maharashtra Government on its own