Vidhan Sabha 2019 : होय, मी सत्तेसाठीच युती केली : उद्धव

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सत्तेसाठीच युती केली
आता असं आहे की, 164 ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. तसे 124 ठिकाणी भाजपचेही आहेत. म्हणून युतीत काही कमवताना काही गमवावं लागतं. पण शेवटी एकत्रित निकाल बघितल्यानंतर आपण कुठे आहोत हे कळतं. मी म्हटले ना, सत्ता आपल्याला हवी आहेच. हो

मुंबई : ठाकरे हे विविध पदांवर लोकांना बसवतात. पण मी बसलोय ना अजून. मी काय शेतीबिती करणार नाही. अजिबात नाही. मी राजकारण संन्यासही घेणार नाही. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन मी जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. मी त्यांचा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी राजकारण सोडत नाही. भाजपसोबत सत्तेसाठीच युती केल्याचीही कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’साठी संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत सर्व प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. उद्धव ठाकरे युतीवर आणि शिवसेनेच्या पुढच्या वाटचालीवर परखडपणे बोलले. ‘24 तारखेनंतर पुन्हा बोलू. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवून दाखवतो हे माझे शिवसेनाप्रमुखांना वचन आहे!’ असे उद्धव यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे...

सत्तेत राहूनही सातत्याने जनतेचा आवाज बनलो
तुम्ही कोणतेही शब्द वापरा. एक लक्षात घ्या. गेल्या वेळी युती नव्हती. युती का तुटली, कोणामुळे तुटली? हे आता उगाळत बसण्यात अर्थ नाही. ते एक युद्ध होते. आम्ही एक देशभरात उसळलेली लाट महाराष्ट्रात थोपवली. गर्जना, डरकाळ्या या युद्धात किंवा जसा विरोधक समोर असतो त्याप्रमाणे कराव्या  लागतात. गेली पाच वर्षे आम्ही सत्तेत आहोत. सत्तेत राहूनही सातत्याने जनतेचा आवाज बनलो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आलो, न्यायासाठी लढत आलो.

हिंदुत्व हा विचार देशासाठी गरजेचा
लोकसभेला आपण युती केली. त्या वेळी स्वतः अमितभाई माझ्याकडे आले होते. मग मी, ते आणि देवेंद्रजी फडणवीस या तिघांनी मिळून ‘ब्लू सी’ येथे पत्रकार परिषद घेतली. संघर्षाला कारणं लागतात. तशी युतीलासुद्धा कारणं लागतात. तसं पाहिलं तर शिवसेना आणि भाजप हे एका विचारधारेचे पक्ष. मला आजही आठवतंय की, 87 साल हे आपल्या देशाच्या राजकारणाला दिशा देणारं आणि वळण देणारं वर्ष होतं. त्या वेळी पार्ल्याची जी पोटनिवडणूक झाली त्या निवडणुकीने हिंदुत्वाचं महत्त्व दाखवून दिलं. त्या निवडणुकीने दाखवून दिलं की, हिंदुत्व हा विचार देशासाठी किती गरजेचा आहे आणि हिंदुत्व हा विचार निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकतो. मग भाजपच्याही ते लक्षात आलं. आडवाणी यांनाही रथयात्रा काढली. मग प्रमोदजी आले, गोपीनाथजी आले. युतीचं पर्व सुरू झालं. हा सगळा इतिहास झाला. थोडक्यात काय, एकाच विचाराचे दोन पक्ष एकमेकांशी भांडून समविचारी मतांमध्ये विभागणी होऊ न देणं हा हेतू होता. 2014 पर्यंत हा विचार आणि विषय टिकला. 2014 साली मात्र युती तुटली आणि आपण एकमेकांविरुद्ध लढलो. त्यानंतर पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागलं. आताही एकत्रच आहोत. मग पुढे कसं जायचं, काय करायचं हा विचार केल्यानंतर काही निर्णय घ्यावे लागतात. तसे ते घेतले. याचा अर्थ गर्जना कमी झाली असं मी म्हणणार नाही. होय! मी केली युती. युतीसाठी तडजोड केली. कुणासाठी केली, कशासाठी केली, तर माझ्या महाराष्ट्रासाठी केली. एकदा शब्द दिल्यानंतर मी महाराष्ट्राचं हित न बघता तुझं माझं करून खेचाखेची करत राहिलो नाही. तशी ताणाताणी कशासाठी. मग लढायचं असेल तर एकाकी कधीही लढू शकतो.

राममंदिराच्या विषयाला चालना मिळाली
शिवसेनेने अयोध्येत पाऊल टाकल्यापासून राममंदिराच्या विषयाला चालना मिळालीय. केंद्राला जाग आली. ज्या संस्था, संघटना चळवळी करत होत्या त्या खडबडून जाग्या झाल्या आणि याचं श्रेय शिवसेनेला मिळू नये म्हणून राममंदिराचा विषय आपण हाती घेतला पाहिजे. कोणी काय करावं हे सांगण्याएवढा मी मोठा नाही. पण शिवसेनेने काय करायला पाहिजे, मी काय करायला हवं हे मी ठरवू शकतो आणि ते मी ठरवलेलं आहे. म्हणूनच मी अयोध्येत गेलो. त्यानंतर लोकसभेत जिंकल्यानंतर मी पुन्हा अयोध्येत गेलो. याचा अर्थ निवडणुकीनंतरही हा विषय आम्ही लावून धरलाय. आजही हा विषय आमच्या अजेंड्यावर आहेच. पंतप्रधान म्हणालेत की, थोडं थांबा! मग थोडं थांबू. बघू काय होते ते.

सत्तेसाठीच युती केली
आता असं आहे की, 164 ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. तसे 124 ठिकाणी भाजपचेही आहेत. म्हणून युतीत काही कमवताना काही गमवावं लागतं. पण शेवटी एकत्रित निकाल बघितल्यानंतर आपण कुठे आहोत हे कळतं. मी म्हटले ना, सत्ता आपल्याला हवी आहेच. होय, मी सत्तेसाठीच युती केली. त्यात लपवण्यासारखं काही नाहीय. परंतु ही सत्ता असेल तर त्या 164 मतदारसंघांतल्या कार्यकर्त्यांनासुद्धा मी काही ना काही देऊ शकतो. म्हणून मी युती केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut takes interview to Shivsena chief Uddhav Thackeray before Maharashtra Vidhan Sabha 2019