Vidhan Sabha 2019 : संजय राऊतांना शिवसेनेचा दणका? 'या' यादीतून वगळले

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

- पक्षाची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या यादीतून संजय राऊत बाहेर

- संजय राऊतांना दणका दिल्याची चर्चा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पक्षाकडून आपली अधिकृत भूमिका मांडण्यासाठी 17 जणांची निवड करण्यात आली आहे.शिवसेनेच्या यादीत नेहमी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या खासदार संजय राऊत यांचे नाव मात्र यादीतून वगळण्यात आले आहे. वादग्रस्त विधानं करून सेनेची कोंडी करणाऱ्या संजय राऊत यांना विधानसभा निवडणुकीत भूमिका मांडण्यास मज्जाव करून शिवसेनेने चांगलाच दणका दिला असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून रविवारी एक यादी प्रसिद्ध केली.या यादीत दिनांक 21 आणि 24 ऑक्टोबर रोजी विविध प्रसार माध्यमात शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी निवड झालेल्या नेत्यांची आणि प्रवक्त्यांची नावं प्रसिद्ध करण्यात आली.यादीत केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी,आमदार डॉ.मनीषा कायंदे,अनिल परब,खासदार भावना गवळी,धैर्यशील माने यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.याशिवाय पहिल्यांदाच शिवसेनेने सचिव सूरज चव्हाण, नगरसेविका शीतल म्हात्रे, विशाखा राऊत माजी महापौर शुभा राऊळ,माजी आमदार सचिन अहिर,सुनील शिंदे यांना स्थान दिले आहे.तर युवासेनेपैकी सचिव वरूण सरदेसाई,साईनाथ दुर्गे,किशोर कन्हेरे यांचाही अधिकृत प्रतिनिधी म्हणून समावेश केला आहे.

शिवसेनेने यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असायचे.यावेळी मात्र शिवसेनेने राऊत यांचं नाव कापल्याने चर्चांना उधाण आलं आहे.याबाबत शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांना विचारले असता, ही यादी फक्त माध्यमावर भूमिका मांडण्यासाठी देण्यात आली असून, तुम्ही स्वतंत्र त्यांच्याशी उद्या बोलू शकता असे प्रधान यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Rauts name is omitted from the list of Shivsena Spokeperson