esakal | मराठवाड्यात कोठे युतीची सरशी? कोठे काँग्रेसला फटका? | Election Results
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Warkad Writes Article On Marathwada Election Results

मराठवाड्यात भाजप- शिवसेना युतीची ताकद वाढली, तर काँग्रेसची घटली. राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले, असे चित्र दिसत असले, तरी पंकजा मुंडेंचा पराभव; शेकाप, रासपचा विजय नोंद घेण्याजोगा आहे. 

मराठवाड्यात कोठे युतीची सरशी? कोठे काँग्रेसला फटका? | Election Results

sakal_logo
By
संजय वरकड

गेल्यावेळी नरेंद्र मोदी लाटेत 46 पैकी 26 जागांवर विजय मिळविलेल्या शिवसेना- भाजप युतीची मराठवाड्यात या वेळीही सरशी झाली. गेल्यावेळपेक्षा तीन जागा जास्त जिंकत महायुतीने 29 जागा पटकावल्या. मराठवाड्यातील या यशाला परळी मतदारसंघात (जि. बीड) ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंच्या पराभवाने मोठा धक्का दिला. शिवसेनेच्या दोन आणि भाजपची एक जागा वाढली. काँग्रेसच्या तीन जागा घटल्या. गेल्यावेळी "एमआयएम' एक आणि दोन अपक्ष विजयी झाले होते. या वेळी शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षाने प्रत्येकी एक जागा जिंकली. राष्ट्रवादीने आपला आठचा आकडा कायम राखला. 

पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात प्रचाराचा धडाका लावत काँग्रेस- राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे केले. मराठवाड्यात काँग्रेसच्या दिग्गजांना पराभवाची धूळ चारू, अशी भाषा भाजप नेत्यांनी केली. विशेषतः माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा राहणार नाही इथपर्यंत प्रचार करण्यात आला. प्रत्यक्ष निकालात अल्पशा सरशीने महायुतीने आपले पारडे आणखी मजबूत केले, हे मराठवाड्याचे चित्र आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊपैकी सहा जागा शिवसेनेने, तर तीन भाजपने जिंकल्या. सिल्लोडमधून शिवसेनेत प्रवेश केलेले अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध भाजप बंडखोरांनी दंड थोपटले; पण त्यांच्या हाती यश आले नाही. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरेंच्या पराभवाला कारणीभूत ठरले असा ठपका असलेले हर्षवर्धन जाधवही कन्नडमधून पराभूत झाले.

औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी हॅट्ट्रिक साधताना भाजपचे बंडखोर राजू शिंदेंना पलटवार दिला. त्यामुळे भाजपच्या बंडाला आलेले अपयश हे औरंगाबाद जिल्ह्याचे वैशिष्ट्य ठरले. आघाडीला सर्व जागांवर पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्यापेक्षा "एमआयएम'ने औरंगाबाद मध्य आणि पूर्व मतदारसंघात दिलेली लढत अधिक लक्षवेधी ठरली. 

जालना जिल्ह्यात संतोष दानवे (भोकरदन), पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर (परतूर), नारायण कुचे (बदनापूर) यांनी बाजी मारली. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडेंचा पराभव करीत राष्ट्रवादीने तीन जागा खेचल्या. लातूरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख (लातूर), धीरज देशमुख (लातूर ग्रामीण) यांनी अपेक्षेप्रमाणे यश मिळवले; पण ग्रामीण मतदारसंघात "नोटा'ला झालेले 27 हजार मतदान सर्वच पक्षांना इशारा देणारे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही औरंगाबादप्रमाणेच महायुतीने सर्वच्या सर्व जागा पटकावल्या. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले राणाजगजितसिंह तुळजापुरातून विजयी झाले. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी नांदेडच्या भोकरमधून माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण सुमारे लाखाच्या मताधिक्यासने विजयी झाले. परभणी जिल्ह्यात चारपैकी भाजप, शिवसेना, काँग्रेस, रासप यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. तुरुंगामध्ये असलेले "रासप'चे रत्नाकर गुट्टे गंगाखेडमधून निवडून आले, त्यामुळे हा निकाल राज्यात लक्षवेधी ठरला.

हिंगोली जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. खरेतर मराठवाड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या निकालांवर परिणाम करणारा ठरला. निवडणुकीत क्वचितच दुष्काळ, अवेळीचा पाऊस आणि ग्रामीण भागातील खऱ्या समस्यांवर चर्चा झाली.

loading image