मराठीच्या सक्षमतेचा एकनाथांना अभिमान

संत एकनाथ महाराजांना समन्वयवादी संत म्हणून ओळखले जाते. त्यांनी संसार-परमार्थ, दत्त संप्रदाय-वारकरी संप्रदाय आणि अभिजन-सामान्य यांच्यात समन्वय साधला
Marathi
Marathi sakal

संत एकनाथ महाराजांना समन्वयवादी संत म्हणून ओळखले जाते. त्यांनी संसार-परमार्थ, दत्त संप्रदाय-वारकरी संप्रदाय आणि अभिजन-सामान्य यांच्यात समन्वय साधला. अभिजात कला आणि लोककला यांचाही समन्वय साधला. अशा या महान संताने मराठी भाषेची पाठराखण करताना मात्र कठोर भूमिका घेतलेली दिसते आणि संस्कृत जर देवाने निर्माण केली, तर मराठी भाषा काय चोरापासून झाली आहे काय, असा खडा सवाल उपस्थित करीत संस्कृतचा टेंभा मिरवणाऱ्यांना खडसावले.

संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी।

मा प्राकृती काय उणीवी।।

न जुनी म्हणावी। कैसेनि केवीं सुवर्णसुमनें॥

कपिलेचे म्हणावें क्षीर।

मा इतरांचें तें काय नीर।।

वर्णस्वादें एकचि मधुर।

दिसे साधार सारिखें॥

जें पाविजे संस्कृत अर्थे।

तेंचि लाभे प्राकृतें।।

तरि न मनावया येथें।

विषमचि ते कायीं?॥

एकनाथ महाराज म्हणतात, संस्कृतातून ग्रंथनिर्मिती करणारे ते महाकवी, असे जर आपण म्हणत असाल, तर प्राकृतात ग्रंथनिर्मिती करणारे कोणत्या बाबतीत कमी आहेत? सोन्याची जर फुले बनविली, तर तुम्ही त्याला जुनी म्हणून टाकून देता काय? सोने आणि फुले यांचे मूल्य एकच असते ना? कपिला गायीचे दूध ते दूध, मग इतर गाईंचे दूध पाणी असते काय? त्यांचा वर्ण, त्यांचा स्वाद एकसारखाच गोड असेल, तर ती दोन्ही एकच नाहीत काय? जे संस्कृतमधून कळते ते जर प्राकृतमधून कळत असेल, तर या दोघांमध्ये भेद करण्याची आवश्यकता काय?

संस्कृत भाषेतून व्यवहार करणारे लोक मराठीला अर्थात त्या काळच्या प्राकृतला कमी लेखत होते. तेव्हा त्यांना एकनाथ महाराजांनी खडसावत विचारले,

संस्कृतवाणी देवें केली।

तरी प्राकृत काय चोरापासोनि झाली?।।

ते पुढे म्हणतात,

तेवी संस्कृत प्राकृत भाखा। ब्रह्मासी पालट नाही देखा।।

अभय अभेदें वदला एका।

साह्य निजसखा जनार्दन ॥१४॥

ब्रह्मज्ञान मिळवायचे असेल तर ते संस्कृतइतक्याच नेमकेपणाने मराठीतून मिळवता येते. मराठी भाषा कमी क्षमतेची नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तेव्हा उणीव असलीच तर ती भाषा वापरणाऱ्यांच्या क्षमतेची आहे. आपण ती दूर करायला हवी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com