पाचगणी नगरपालिकेकडून पर्यटनस्थळांची "नाकाबंदी'

रविकांत बेलाेशे
Tuesday, 8 September 2020

ई-पास रद्द केल्याने पर्यटकांच्या झालेल्या गर्दीमुळे पाचगणी, महाबळेश्वर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पाचगणी नगरपालिकेने सर्व पर्यटनस्थळांची "नाकाबंदी' केली आहे. 

भिलार (जि. सातारा) : राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरातून पर्यटनासाठी पर्यटकांचा लोंढा पाचगणी, महाबळेश्वरला येत आहे. या गर्दीमुळे पाचगणी व महाबळेश्वर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पाचगणी नगरपालिकेने सर्व पर्यटनस्थळांची "नाकाबंदी' केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना अजूनही "वेट अँड वॉच' करावे लागणार आहे. 

राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवून ई-पास रद्द केले, तसेच हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी दिल्याने पाचगणीत गर्दी वाढणार, हे ओळखून मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या आढावा बैठकीनंतर पालिकेची तातडीची बैठक घेऊन कोरोना पार्श्वभूमीवर आढावा घेतला. पर्यटनस्थळे, उद्याने, बाल उद्याने, खेळांची उद्याने अद्यापही उघडण्यासाठी परवानगी नाही. शासनाच्या निर्णयाने लॉकडाउनमध्ये कोंडलेले पर्यटक वाढून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने टेबल पॉइंट, सिग्ने पॉइंट, पारसी पॉइंट, बेबी पॉइंट ही सर्व पर्यटनस्थळे कुलूप बंद केली आहेत. काही पॉइंटच्या मुख्य रस्त्यांना अडथळे लावून प्रवेश बंद केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पर्यटक वाढू लागले आहेत. बरेच पर्यटक हे अडथळे बाजूला करून पुढे जात आहेत. त्यावर पालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे. 

गेली सहा महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाउन व जिल्हाबंदी असल्यामुळे सर्व जण आपापल्या घरातच अडकून पडले होते. आता अनलॉक केल्याने हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील हॉटेल व खासगी बंगल्यात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पाचगणीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. 

शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून 12 पथके तयार करण्यात आली आहेत. शहरात मास्क न वापरणे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे, तसेच निष्कारण गर्दी करणाऱ्यांवर पोलिस व पालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने ई-पास रद्द केले असले, तरी पर्यटनावर मात्र अद्यापही निर्बंध आहेत. येणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीतून शहर कोरोना संसर्गापासून रोखणे मोठे आव्हान आहे. त्यासाठी पालिका विविध उपाययोजना करत आहे. त्याला सर्व ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायिक व पर्यटकांनी सहकार्य करावे. 

- गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, पाचगणी 

संपादन ः संजय साळुंखे 

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच वाजला बॅंड! वाचा, नेमका काय आहे प्रकार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara 'Blockade' of tourist places by Pachgani Municipality