esakal | सातारा जिल्ह्यातील "हळद' पिकविणाऱ्या गावात "आल्या'ची एन्ट्री!
sakal

बोलून बातमी शोधा

karad

गेली चार ते पाच दशके पश्‍चिम महाराष्ट्रात हळदीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कऱ्हाड तालुक्‍यातील वडगाव हवेलीतील शेतकऱ्यांनी पीक बदल अवलंबला आहे. या हळदीच्या गावात "आले' या मसाले पिकाने एन्ट्री केली आहे. 

सातारा जिल्ह्यातील "हळद' पिकविणाऱ्या गावात "आल्या'ची एन्ट्री!

sakal_logo
By
अमाेल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : गेली चार ते पाच दशके पश्‍चिम महाराष्ट्रात हळदीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडगाव हवेलीत (ता. कऱ्हाड) शेतकऱ्यांनी पीक बदल अवलंबला आहे. सांगली मार्केटमधील उच्चांकी भाव खाणारी ही हळद पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वपरिचित आहे. पण, यंदा याच हळदीच्या गावात "आले' या मसाले पिकाने एन्ट्री केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हे पीक लागवडीखाली आले असले, तरी यंदा पिकातील उत्पन्न पाहून हा पीक बदल कायम राहण्याचीही शक्‍यता आहे. 

डोंगरउताराची निचरा होणारी जमीन असल्याने गेल्या चार ते पाच दशकांपासून तेथे हळदीचे पीक घेतले जाते. वडगाव हवेलीसह बेलवडे बुद्रुक, पाल, शिरगाव, इंदोली या परिसरामध्ये हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागातील हळदीत औषधी गुण असलेल्या कुर्क्‍युमिनचे (CURCUMIN) प्रमाण पाच ते सहा टक्के आहे. वायगाव (जि. वर्धा) या गावाने हळदीत देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. तेथील हळदीतील कुर्क्‍युमिनच्या टक्केवारीनंतर कऱ्हाड परिसरातील हळदीतील टक्केवारीचे प्रमाण चांगले मानले जाते. या हळदीचा रंग इतरांच्या तुलनेत गडद पिवळा असून चवही वेगळी आहे. 

हळदीचे उत्पादन परंपरागत पद्धतीने घेतले जाते. त्याबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन अधिकाधिक उत्पन्न घेणारे शेतकरी तेथे बरेच आहेत. वडगावच्या हळदीचा दर्जा सर्वोत्तम असला, तरी परिसरात मोठी बाजारपेठ नाही. शेतकऱ्यांना विक्रीसाठी सांगली मार्केट गाठावे लागते. सांगलीत विक्री झालेल्या वडगावच्या हळदीची देश-विदेशात निर्यात होते. कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तेथील शेतकऱ्यांनी कृष्णा-कोयना ऍग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. कंपनीमार्फत हळद प्रक्रिया उद्योग उभारला आहे. त्याबरोबर मार्केटिंगची फळी उभारण्याचे काम सुरू आहे. वडगावमधील उत्पादित प्रति क्विंटल हळदीस आजअखेर सांगली मार्केटमध्ये कमीत कमी पाच व जास्तीत जास्त 18 हजार रुपयांपर्यंत शेतकऱ्यांनी भाव घेतला आहे. 40 वर्षांपूर्वी सांगली मार्केटमध्ये सर्वाधिक दर घेणारे शेतकरी म्हणूनही या गावाचा गौरव झाला आहे. यंदा कोरोनाच्या संकटात वडगावची हळदही सापडली. 

लॉकडाउनमुळे प्रति क्विंटलला अगदी पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे नवीन लागवडीच्या क्षेत्रात 25 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. तरीही घरटी हळद पिकविण्याचे प्रमाण तेच आहे. हळदीचे क्षेत्र कमी दिसत असले, तरी प्रत्येकाने थोडे फार का होईना क्षेत्र या पिकासाठी आरक्षित ठेवल्याने हळदीची परंपरा कायम आहे. कोरोनाच्या संकटातील अनुभवातून हळदीच्या गावात यंदा पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी आले पिकाचा प्रयोग केला आहे. या पिकास उपयुक्त जमीन वडगावला असल्याने प्रायोगिक तत्त्वावर घेतलेले आले हे पीक निश्‍चित उत्पन्न देणार असल्याची संबंधित शेतकऱ्यांना खात्री आहे. अपेक्षित उत्पन्न मिळाल्यास हे पीक वडगावच्या मातीत रुजेल, अशीही शक्‍यता आहे. 


गेल्या तीन वर्षांत हळदीचे मार्केट अस्थिर राहिले आहे. उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे वेगळा प्रयोग म्हणून गावात सहा ते सात शेतकरी आले पिकाकडे वळले आहेत. पहिल्या प्रयोगातील यश कसे मिळते, ते पाहून हे पीक पुढे नेण्याचा विचार आहे. 

- बाळासाहेब जगताप, शेतकरी, वडगाव हवेली 
 

(संपादन ः संजय साळुंखे)

तब्बल 166 वर्षांपासून या गावात एक गणपतीची परंपरा 

loading image
go to top