जागतिक वारसास्थळी फुलांचा नजराणा यंदा होणार "कैद'?

सुर्यकांत पवार
Tuesday, 25 August 2020

कास पठराचा पुष्प खजाना पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कासवर फुलांचा नजराणा फुलायला सुरवात होते. यावर्षी हंगाम चालू राहणार की बंद, याबाबत वन विभाग व कार्यकारी समितीला मार्गदर्शक सूचना नसल्याने हंगामाबाबत अनिश्‍चितता आहे. 

कास (जि. सातारा) : जागतिक वारसास्थळात समावेश झालेल्या कास पठराचा पुष्प खजाना पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कासवर फुलांचा नजराणा फुलायला सुरवात होते. फुले उमलण्याचा कालावधी आठ दिवसांवर आला तरी अद्यापही यावर्षी हंगाम चालू राहणार की बंद, याबाबत वन विभाग व कार्यकारी समितीला मार्गदर्शक सूचना नसल्याने हंगामाबाबत अनिश्‍चितता आहे. 

कोरोना महामारीत हे पुष्पवैभव यावर्षी बंद राहणार की काही अटी, शर्तींवर चालू राहणार, याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने कासवर अवलंबून असलेले अनेक जण अडचणीत आहेत. कास पठार बंद राहिल्यास त्याचा फटका कास पठाराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या व्यवस्थापन समितीसह कासच्या परिसरात पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांना बसणार आहे. साधारणतः 15 ऑगस्टनंतर पावसाचे प्रमाण कमी झाले की कासवर वेगवेगळ्या रंगाची फुले उमलण्यास प्रारंभ होतो. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कासवर संयुक्त कार्यकारी समितीमार्फत शुल्क वसुलीला सुरवात होते. साधारणतः दीड महिना हा हंगाम चालतो. या दीड महिन्यात लाखो पर्यटक कासवर हजेरी लावतात. या पर्यटकांच्या माध्यमातून कासचे व्यवस्थापन पाहणाऱ्या समितीला महसूल मिळतो. या समितीच्या माध्यमातून 150 ते 200 लोकांना पठारावर रोजगार प्राप्त होतो, तर पठाराच्या देखभालीसाठीही वर्षभरासाठी निधी उपलब्ध होतो. कास परिसरात अनेक लोकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून हॉटेल व इतर पर्यटनपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. पर्यटनामुळे सातारा, मेढा, कास, बामणोली व तापोळा या बाजारपेठेतील व्यवहार मोठ्या प्रमाणात होअन हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होतो. यावर्षीच्या हंगामाबाबत अद्यापही अनिश्‍चितता असल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसून आर्थिक गणित कोलमडणार आहे. 

राज्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी बंदी असली तरी अनलॉकच्या प्रक्रियेत बरेचसे व्यवहार सुरळीत झाले आहेत. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणारांची संख्या प्रचंड असल्याने या व्यवसायाबाबतही काही अटी, शर्ती घालून चालू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

कास पठाराच्या हंगामाबाबत अद्यापही कसलाच निर्णय झाला नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येईल. वरिष्ठ सांगतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. 

- रंजनसिंह परदेशी, वन क्षेत्रपाल, मेढा 

कास पठाराच्या हंगामावर अनेकांचे जीवनमान अवलंबून असून हंगाम सुरू न झाल्यास हजारो लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. दहा ते 50 वयोगटातील लोकांना अत्यावश्‍यक सूचना पाळून प्रवेश दिल्यास काही प्रमाणात हंगाम चालू करता येईल. शासनाने अटी व शर्ती घालून हंगाम चालू करण्यास परवानगी दिल्यास कार्यकारी समिती हंगाम चालू करेल. 

- सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती 

स्थानिक पातळीवर कोरोनाचा प्रसार होऊ नये, याची दक्षता घेतली पाहिजे. येथे काम करणारे कर्मचारी गरीब असून ते सुरक्षित राहावेत, यासाठी हंगाम चालू न झाल्यास योग्य होईल. तरीही शासन पातळीवरून जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी केली जाईल. 

- बजरंग कदम, अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती 

संपादन ः संजय साळुंखे 
 

महावितरण 875 व्हॉट्‌सअॅप ग्रुपव्दारे साधणार ग्राहकांशी संवाद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara World Heritage Flower Gift to be 'Captured' This Year?