Satyajit Tambe : काँग्रेसमधील गोंधळ चव्हाट्यावर! सत्यजीत तांबेंनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, एबी फॉर्म.. Satyajit Tambe made a big secret explosion; Congress send AB form wrong | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyajit Tambe

Satyajit Tambe : काँग्रेसमधील गोंधळ चव्हाट्यावर! सत्यजीत तांबेंनी केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, एबी फॉर्म..

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसचा एबी फॉर्म न जोडता अपक्ष फॉर्म भरल्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर काँग्रेससोबतची साथ सोडून तर भाजपासोबत जातात की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. काँग्रेसचे नाव न वापरताही सत्यजित तांबे मोठ्या मताधिक्याने अपक्ष म्हणूनच विजयी झाले. त्यांनी आज त्यांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.

नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांब यांनी केला. माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवालही त्यांनी केला.

मला संधी मिळू नये, युवकांना संधी मिळू नये म्हणून वरच्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले. माझ्या वडिलांना शो कॉज नोटिस न देता एक मिनिटात निलंबित करण्यात आलं असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केलं. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं काम काही नेत्यांकडून केलं जात आहे असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.

फॉर्म चुकीचे आल्याचेही त्यांनी पक्षाला कळवले होते. ते म्हणाले जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचं कळवलं नसतं असं सत्यजित तांबे म्हणाले.

त्याचबरोबर पुढे बोलताना म्हणाले की, मला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला, त्यावर काहीही खुलासा करण्यात आला नाही. पण पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून तो आतच मिटवावा अशी भूमिका मी घेतल्यानंतर, "मला पक्षाचा पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी एक पत्र लिहायला लावलं. त्यानंतर मला त्यातून माफी मागायला सांगितली. मी पक्षामध्ये अनेक वर्षे काम केलं, त्यामुळे मी माफीही मागायला तयार झालो. पण एकीकडे मला माफी मागायला लावली आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी दिल्लीशी संपर्क केला, तरीही मला पक्षाने पाठिंबा दिला नाही" अशी धक्कादायक माहिती पत्रकार परिषदेत सत्यजित तांबे यांनी दिली आहे.