अंधारकोठडी ते स्मारक

मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संकल्पनेतून आणि भागोजीशेठ कीर यांच्या भरीव देणगीतून भारतातील पहिले समाज मंदिर पतितपावन मंदिर निर्माण झाले. या मंदिराच्या शेजारी सावरकर स्मारक असून, क्रांतिकारकांची छायाचित्रे, 350 व्यक्तींच्या हातांचे ठसे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चष्मा, जांबिया, व्यायामासाठी वापरत असलेले मुद्‌गल, पुस्तकातून पाठविलेले रिव्हॉल्व्हर जतन केले आहे.

रत्नागिरी - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची येथील विशेष कारागृहातील अंधारकोठडी, शिरगाव येथील ज्या घरात ते वास्तव्यास होते ती खोली आजही जशीच्या तशी घरमालक दामले यांनी जतन करून ठेवली आहे. सावरकरप्रेमी पर्यटक येथे येऊन रोमांचित होतात. रत्नागिरी ही स्वातंत्र्यवीरांची कर्मभूमी होती. त्यांनी रत्नागिरीमध्ये असताना स्पर्शबंदी, व्यवसायबंदी, मंदिर प्रवेशबंदी, रोटीबंदी आणि वेदोक्तबंदी या सर्व बंदी उठवून हिंदू धर्मसुधारणा केली. हिंदू संघटन, अस्पृश्‍यता निवारण, भाषा शुद्धीकरण, स्वदेशीचा पुरस्कार केला. समाजातील उपेक्षितांना विठ्ठल मंदिर खुले केले.

1921 ते 1923 या काळात इंग्रजांनी सावरकर यांना रत्नागिरी येथील कारागृहातील अंधारकोठडीत स्थानबद्ध केले होते. 6 बाय 8 फुटांच्या या कोठडीत सुमारे 40 किलोचे लोखंडी गोळे, हातापायांत दंडाबेडी अडकवली होती. अंगावर कुडता आणि 50 वर्षांचा कैदी म्हणून कथलाचा बिल्ला घालून सात कुलपांच्या आत बंदिस्त केले. जेवणात जाडी भाकरी आणि त्यात दगडाचे लहान तुकडे मिसळून दिले जायचे. खोलीत फक्त झोपता येईल, एवढीच जागा होती. जेवण आणि शौचास तेथेच बसावे लागे. येथे त्यांनी प्रचंड यातना सहन केल्या. 1937 पर्यंत त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध करून ठेवले होते. या कोठडीचे 21 मे 1981 पासून सावरकर स्मारकात रूपांतर झाले. अनेक सावरकरप्रेमी या स्मारकास भेट देतात. सकाळी 10 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत भेट देता येते.

शहराजवळील शिरगावातील (कै.) विष्णुपंत दामले यांच्या घरातील एका खोलीत सावरकरांचे वास्तव्य होते. ही खोली वैजनाथ दामले यांनी जतन करून ठेवली आहे. त्या काळात बांधलेल्या हनुमानाच्या लहान घुमटीच्या उद्‌घाटनानंतर "तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू' या एकता गीताची रचना सावरकरांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांची याच घरात भेट झाली. त्यानंतरच संघाची स्थापना झाल्याचे सांगितले जाते.

रत्नागिरीच्या वास्तव्यात सावरकरांनी झाडगाव शेरे नाका येथे वास्तव्यास असलेल्या सावरकर सदनमध्ये "संगीत संन्यस्तखङ्‌ग', "उत्तरक्रिया', "उःशाप' ही नाटके, "माझी जन्मठेप', "काळे पाणी' "1857 चे स्वातंत्र्यसमर' यांसह निबंध, कादंबऱ्यांचे लेखन केले.

पहिले समाज मंदिर रत्नागिरीत
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संकल्पनेतून आणि भागोजीशेठ कीर यांच्या भरीव देणगीतून भारतातील पहिले समाज मंदिर पतितपावन मंदिर निर्माण झाले. या मंदिराच्या शेजारी सावरकर स्मारक असून, क्रांतिकारकांची छायाचित्रे, 350 व्यक्तींच्या हातांचे ठसे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा चष्मा, जांबिया, व्यायामासाठी वापरत असलेले मुद्‌गल, पुस्तकातून पाठविलेले रिव्हॉल्व्हर जतन केले आहे. रत्नागिरीतील पर्यटकांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. सावरकरांच्या जीवनावरील चित्रफीतही पर्यटकांना दाखविण्यात येते.

 

Web Title: Sawarkar Punyatithi special article