

schools
तात्या लांडगे
सोलापूर : शाळांनी संचमान्यतेत नोंदविलेली वर्गनिहाय पटसंख्या आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी यांची खातरजमा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरसह राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील इयत्ता दुसरी ते नववी आणि अकरावीच्या वर्गातील पटसंख्या पडताळली जाणार आहे. ११, १५ व २२ एप्रिल रोजी अधिकारी पटपडताळणी करणार आहेत. यापूर्वी शाळा सुरु असताना पटपडताळणी व्हायची, यंदा पहिल्यांदाच परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरुन पटसंख्या मोजली जाणार आहे.
संचमान्यतेत आपल्या शाळेतील शिक्षक अतिरिक्त होऊ नयेत किंवा नवीन पदे भरता यावीत, यासाठी काही ठिकाणी एकाच विद्यार्थ्यांची नोंद दोन-तीन शाळांमध्ये केल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकाच दिवशी शाळांमधील पटपडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यातून पटसंख्येतील बनवेगिरी उघड होणार आहे.
पटपडताळणीसाठी शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांकडून पथके नेमली जाणार आहेत. त्यामध्ये केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) अधिव्याख्याते, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक, विस्ताराधिकारी तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना) यांचा समावेश असेल. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर राहणार आहे. पडताळणीवेळी शाळांमध्ये उपस्थित असलेली पटसंख्याच संचमान्यतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. गैरहजर विद्यार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करून ते नेमके कोणत्या शाळेचे आहेत, याचीही खातरजमा केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
शिक्षण संचालकांचे आदेश असे...
इयत्ता अकरावीच्या अंतिम सत्राच्या परीक्षेदरम्यान मराठी, इंग्रजी व भौतिकशास्त्र पेपरच्या दिवशी पटपडताळणी करावी.
इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ‘पॅट’ परीक्षेच्या दिवशीच पडताळावी.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती संबंधित ‘पॅट’ दिवसांतच तपासावी; त्या दिवशी मराठी, गणित व इंग्रजी विषयांचे पेपर ठेवावेत.
अकरावीचे मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी पेपर अनुक्रमे ११, १५ व २२ एप्रिल रोजी घेण्यासाठी वेळापत्रक तयार करून विद्यार्थ्यांना कळवावे.
पटपडताळणीनंतर मुख्याध्यापक, क्लस्टर हेड, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनवरून माहिती भरावी.
एकाचवेळी सर्व शाळांमध्ये पडताळणी
शाळांनी नोंदविलेल्या पटसंख्येनुसार आता संचमान्यता झाली आहे. त्याअनुषंगाने अंतिम सत्र परीक्षेच्या निमित्ताने ११, १५ व २२ एप्रिल रोजी प्रत्येक शाळेतील वर्गांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती पडताळली जाणार आहे. त्यासाठी पथके नेमली जातील, ते अधिकारी प्रत्येक शाळेला भेटी देऊन तेथील विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवतील. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.
- डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (माध्यमिक)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.