दहा जिल्ह्यांमधील शाळा उघडल्याच नाहीत ! साडेसोळाशे शिक्षक पॉझिटिव्ह; 59 पैकी 57 लाख विद्यार्थी घरीच

तात्या लांडगे 
Tuesday, 24 November 2020

23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आणि पालकांमधील संभ्रम पाहायला मिळाला.

सोलापूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात असतानाच नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. शाळेत विद्यार्थी पाठवण्यापूर्वी संबंधित पालकांची संमती असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या भीतिपोटी राज्यातील तब्बल 57 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपला पाल्य शाळेत पाठवलाच नाही; तर दुसरीकडे जळगाव, ठाणे, धुळे, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, मुंबई आणि हिंगोली या जिल्ह्यातील एकही शाळा पहिल्या दिवशी उघडली गेली नाही. 

राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या 25 हजार 866 शाळा आहेत. या शाळांमध्ये 59 लाख 27 हजार 456 विद्यार्थी प्रवेशित आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी 2 लाख 75 हजार 470 शिक्षक असून त्यांच्या सेवेसाठी 96 हजार 666 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार आतापर्यंत 1 लाख 41 हजार 720 शिक्षकांची कोरोना चाचणी पार पडली आहे. त्यामध्ये 1353 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून, 44 हजार 313 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये 290 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आणि पालकांमधील संभ्रम पाहायला मिळाला. त्यानंतर सरकारने शाळा सुरू करण्याबद्दलचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपविला. तत्पूर्वी, संबंधित पाल्य शाळेत पाठवण्यापूर्वी त्या पालकांनी लेखी संमतीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी 25 हजार 866 पैकी 16 हजार 779 शाळा बंदच राहिल्या. तर दुसरीकडे राज्यातील एकूण 59 लाख 57 हजार 456 विद्यार्थ्यांपैकी 56 लाख 28 हजार 263 विद्यार्थी शाळेत गेलेच नाहीत. 

जिल्हानिहाय कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 
सोलापूर 226, जळगाव 27, धुळे 13, नांदेड 73, नागपूर 81, नाशिक 37, परभणी 2, पालघर 24, मुंबई 31, हिंगोली तीन, अमरावती 19, गडचिरोली 103, उस्मानाबाद 83, सातारा 90, अकोला 54, यवतमाळ 89, लातूर 41, जालना 56, औरंगाबाद 14, नंदुरबार 22, बुलढाणा 68, गोंदिया 94, चंद्रपूर 114, भंडारा 27, रत्नागिरी 9, सांगली 22, रायगड 21, सिंधुदुर्ग 14, वाशीम 31, बीड 24, कोल्हापूर 35, नगर 24, पुणे 26 आणि वर्धा 45 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आणखी सव्वा लाख शिक्षकांची तर पन्नास हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट झालेली नाही. 

ठळक बाबी... 

  • नववी ते बारावीपर्यंत राज्यात 25 हजार 866 शाळा; आठ टक्केसुद्धा विद्यार्थी शाळेत गेले नाहीत 
  • पहिल्याच दिवशी दहा जिल्ह्यांमधील शाळा उघडल्याच नाहीत; नऊ हजार 127 शाळा सुरू 
  • दोन लाख 75 हजार 470 शिक्षकांपैकी 1 लाख 41 हजार 720 शिक्षकांची पार पडली कोरोना टेस्ट 
  • एक हजार 353 शिक्षक तर 290 शिक्षकेतर कर्मचारी आढळले कोरोना पॉझिटिव्ह 
  • एकूण 59 लाख 27 हजार 456 विद्यार्थ्यांपैकी अवघे दोन लाख 99 हजार 193 विद्यार्थी पहिल्या दिवशी गेले शाळेत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in ten districts were not opened on the first day in the Maharashtra state