दुसऱ्या टप्प्यासाठी भाजपच्या जोरबैठका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई - नगरपालिका निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात निर्णायक आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातल्या 40 ठिकाणची गणिते भाजप पुन्हापुन्हा जुळवून बघते आहे. राज्यात मिळालेला पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आघाडी राखणे आवश्‍यक आहे. भाजपसमोर प्रश्‍नचिन्ह ठरलेल्या मराठवाड्यातील दोन महत्त्वांच्या जिल्ह्यांमध्ये तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शक्तिस्थान असलेल्या पुणे जिल्ह्यात या निवडणुका होणार आहेत. 

नांदेड हा एकमेव लोकसभा मतदारसंघ भाजपला जिंकता आलेला नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा गड असलेल्या या जिल्ह्यात लगतच्याच लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे नेते राजीव सातव निवडून आले आहेत. हा जिल्हा भाजपला अत्यंत आव्हानात्मक वाटत असून, येथे निवडणूक कशी लढावी, याबद्दल चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना नुकतेच बोलावून घेतले होते. 

लातूर येथेही निवडणुका होणार आहेत. कॉंग्रेसचे दिवंगत विलासराव देशमुख यांच्या या जिल्ह्यात भाजपने प्रवेश केला आहे. मात्र, या जिल्ह्यावर भाजपला संपूर्ण वर्चस्व मिळवता आलेले नाही. अमित देशमुख सध्या केवळ आमदारकीत न रमता संपूर्ण परिसरात फिरत आहेत. त्यामुळे भाजपसाठी हा जिल्हाही महत्त्वाचा ठरणार आहे. लातूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या टापूत भाजप या वेळी उत्तम कामगिरी नोंदवू शकेल, असा दानवे यांना विश्‍वास आहे. पुणे जिल्ह्याची जबाबदारी गिरीश बापट यांच्यावर असल्याने ते हिवाळी अधिवेशनातील बहुतांश वेळ प्रचारासाठी बाहेर असतील. तुलनेने नागपूर जिल्हा मात्र सोपा असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी प्रचारात अग्रेसर राहणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The second phase of the BJP party meetings