विठ्ठल मंदिरात खासगी सुरक्षकाची मुजोरी (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

विठ्ठल मंदिरात गाभाऱ्यात नेमणुकीस असलेल्या एका सुरक्षारक्षकांकडून भाविकांना जोराने पुढे ढकलले जात आहे. महिला आणि वृद्ध भाविकांना देखील अमानुष पद्धतीने पुढे ढकलले जात असल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंढरपूर : श्रीविठ्ठल मंदिरात गाभाऱ्यात नेमणुकीस असलेल्या एका सुरक्षारक्षकांकडून भाविकांना जोराने पुढे ढकलले जात आहे. महिला आणि वृद्ध भाविकांना देखील अमानुष पद्धतीने पुढे ढकलले जात असल्याने वारकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आषाढी यात्रेच्या निमित्ताने सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग दहाव्या क्रमांकाच्या पत्राशेड पर्यंत गेली आहे. भाविक विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने तासन्तास रांगेत थांबलेले आहेत.मंदिरात पोहोचल्यावर किमान एक क्षण तरी देवाचे दर्शन घेता यावे अशी सर्वसामान्य भाविकांची अपेक्षा आहे परंतु दर्शन रांगेचा वेग वाढवण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात नियुक्त करण्यात आलेल्या एका सुरक्षारक्षकांकडून दर्शनास आलेल्या भाविकांना अमानुषपणे पुढे ढकलले जात आहे.

अबालवृद्ध  महिला असा कोणताही विचार न करता त्या सुरक्षारक्षकांकडून  हाताने जोराने पुढे ढकलले जात आहे. विशेष म्हणजे अनेक पोलिस मंदिरात मधूनच दर्शनास जात आहेत. असे पोलीस दर्शनास आले की मात्र या सुरक्षारक्षकांकडून त्यांना साधा हात सुद्धा लावला जात नाहीये. हा प्रकार पाहून वारकऱ्यां मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अत्यंत चांगले नियोजन केलेले असताना दुसरीकडे अशा घटनांमुळे विनाकारण समितीला रोषाला सामोरे जावे लागत आहे.

यासंदर्भात प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांना विचारले असता ते म्हणाले आज सकाळी हा प्रकार निदर्शनास आला. या प्रकाराची तातडीने दखल घेण्यात आली आहे. संबंधित सुरक्षारक्षकाला बदलले असून गाभाऱ्यात आता त्या जागी महिला सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security Guard Misbehavior with Devotees in Pandharpur