Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या सात आमदारांचा पत्ता कट..! पृथ्वीराज चव्हाण यांनाही उमेदवारी नाही

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

काॅग्रेसने पहिल्या यादीत सात विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला असून इतर पक्षांची हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आमदारांना दणका दिला आहे.

मुंबई: काॅग्रेसने पहिल्या यादीत सात विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला असून इतर पक्षांची हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आमदारांना दणका दिला आहे. यामधे, अस्लम शेख ( मालाड), राहूल बोंद्रे (चिखली), भारत भालके (पंढरपूर), सिध्दाराम म्हेत्रे (अक्कलकोट), डी.एस.अहिरे (साक्री), काशिराम पावरा (शिरपूर) यांचा समावेश आहे. 
तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सोनिया गांधी यांनी सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा आदेश देत कराड विधानसभेची उमेदवारी नाकारली असल्याची माहिती विश्वनिय सुत्रांनी दिली आहे. 

काॅग्रेसच्या 47 उमेदवारांची पहिली यादी निश्चीत झाली असून उद्या अथवा परवा ती जाहिर होणार आहे. पृथ्वीराज चव्हाण वगळता उमेदवारी नाकारलेले इतर सहा आमदार भाजप व शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र युतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांनी काॅग्रेस सोडण्याचे धाडस केले नाही. मात्र, या सहा आमदरांच्या भरोशावर बसून ऐनवेळी तोंडावर पडण्यापेक्षा यांना उमेदवारीच नाकारण्याचा धाडसी निर्णय काॅंग्रेसने घेतला आहे.

दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा आदेश काॅग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असला तरी तो काँग्रेसला देण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शविली आहे. स्वत: शरद पवार यांनीच पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारी बाबत सोनिया गांधीशी चर्चा केल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven Congress MLAs ticket cut in Vidhansabha Election 2019