लॉकडाउनमध्ये पोटदुखीत ७० टक्‍क्‍यांनी वाढ; २५ ते ५० वयोगटांना अधिक त्रास 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 20 August 2020

लॉकडाउनमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये ७० टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून हे रुग्ण २५ ते ५० वर्षे वयोगटातील असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या कालावधीत आर्थिक अडचणी तसेच आरोग्याच्या समस्येमुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत.

मुंबई - गेल्या चार महिन्यांपासून लागू असलेल्या लॉकडाउनमुळे बहुतांश नागरिक घरीच अडकले आहेत. त्यामुळे शारीरिक हालचालींची कमतरता, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना छातीत जळजळ, पोटात दुखणे, मळमळणे, गिळण्यास अडचणी, पोट खराब होणे आदी लक्षणांसह एसोफेजियल रिफ्लक्‍स (जीईआरडी) सारख्या पोटांच्या आजारांनी ग्रासले आहे. रोज असे ३ ते ४ रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे येथील अपोलो स्पेक्‍ट्रा हॉस्पिटलचे सर्जन डॉ. इरबाज रियाझ मोमीन यांनी सांगितले. 

आरोग्याच्या विविध समस्या 
लॉकडाउनमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये ७० टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून हे रुग्ण २५ ते ५० वर्षे वयोगटातील असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या कालावधीत आर्थिक अडचणी तसेच आरोग्याच्या समस्येमुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत. चहा, कॉफी किंवा अल्कोहोलचे अतिसेवन केल्याने झोपेच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. घरबसल्या लोक अधिक तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खातात आणि शारीरिक हालचाली मात्र मंदावल्या आहेत. या कारणांमुळे नागरिकांमध्ये पोटाच्या तक्रारी जाणवू लागल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अन्ननलिकेच्या कर्करोगाचाही धोका 
‘जीईआरडी’सारख्या आजाराचे वेळीच निदान होणे गरजेचे आहे. उपचारास उशीर झाल्यास गुंतागुंत वाढून अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्‍यता २५ पट वाढते, असे डॉ. मोमीन यांनी सांगितले. यात काही प्रकरणांत शस्त्रक्रियाही करावी लागते. त्यामुळे रुग्णांनाही लवकरच दिलासा मिळतो व ते दैनंदिन कामांनाही लवकर सुरुवात करू शकतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तणावमुक्त जीवनशैलीचाही फायदा 
पोटाचे आजार टाळण्यासाठी पोषक आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, प्रमाणात अन्नपदार्थ खावेत आणि रात्री उशिरा जेवण टाळावे. जेवणानंतर लगेच झोपू नयेत, कॉफीचे सेवन प्रमाणात करावेत, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला. तसेच, तणावमुक्त जीवनशैली असल्यास त्याचाही फायदा होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seventy percent patients increase in stomach pain in lockdown