राज्यातील किनाऱ्यांवरही शॅक्स 

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 26 June 2020

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कुट्या हंगामी स्वरूपाच्या असतील. 

मुंबई - राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन वाढविण्यासाठी शॅक्स (चौपाटी कुटी) उभारण्यासंदर्भातील धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या कुट्या हंगामी स्वरूपाच्या असतील. सध्या प्रायोगिक तत्त्वावर रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली; रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या आठ किनाऱ्यांवर शॅक्स उभारण्यात येतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल. एका चौपाटीवर कमाल १० कुटी उभारता येतील. स्थानिकांना ते उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. यासंदर्भातील अर्ज www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, पुढील वर्षापासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील. या कुट्यांचे तीन वर्षांकरिता वाटप करण्यात येईल. शॅक्सचा आकार आणि इतर नियम ठरविण्यात आले असून, प्रत्येक शॅक्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरा देखील असेल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शासकीय मालमत्तांचा विकास करणार 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा आणि मालमत्तांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी खासगीकरणाच्या धोरणास तत्त्वत: मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात गणपतीपुळे, माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर, मिठबाव येथील महामंडळांचे रिसॉर्ट तसेच ताडोबा आणि फर्दापूर (औरंगाबाद) येथील मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येईल. या मालमत्ता पोटभाड्याने देण्याचा कालावधी उच्चस्तरीय समिती ठरवेल. तसेच, जमिनीसाठी आकारावयाचे अधिमूल्य व वार्षिक भाडे देखील निश्चित करण्यात येईल. प्रत्येक प्रकल्पासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shacks to boost tourism on the beaches in the maharashtra state