esakal | मनाचिये वारी : वाट हरीची पाहे हर
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal Rukmini

मनाचिये वारी : वाट हरीची पाहे हर

sakal_logo
By
शंकर टेमघरे

सासवडकरांचा निरोप घेऊन माऊलींचा सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होतो. खंडेरायाचे दर्शन होणार असल्याने बहुतांश वारकरी खूष असतात. विश्रांतीमुळे वाटचालीत कमालीचा उत्साह असतो. बोरावकेमळा, शिवरी करीत सोहळा सांजवेळी जेजुरीसमीप पोचतो. तेव्हा प्रत्येक वारकऱ्यांची लक्ष असते, ती मल्हारी गडावर. गड दिसताच आपोआप वैष्णवांचे हात जोडले जातात. मल्हारी देवाचे अभंग सुरू होतात. दिंड्यांमध्ये मृदंगातून दिमट्याचे आवाज येऊ लागतात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या आवाजाने परिसर दणाणून जातो. जेजुरी म्हटले, की खंडेरायाचा भंडारा आलाच. पालखीने जेजुरीच्या हद्दीत प्रवेश केला, की पोतंभर भंडारा रथावर जेजुरीकर टाकतात. तेव्हा रथ पिवळाधमक होतो. यावेळी वारकरी शंकराचे अभंग म्हणून खंडेरायाला एक प्रकारे नमनच करतात. पालखी जेजुरीला आली की शैव आणि वैष्णव एकत्र येतात. खंडेराया शंकरांचा अवतार म्हणजे शैवपंथी आहे, तर माऊली हे विष्णूचा अवतार असल्याने ते वैष्णवपंथी. हे दोन्ही पंथीय एकाच गावात मुक्कामी राहतात. त्यामुळे अनेक वारकरी खंडेयारायाच्या दर्शनाला जातात. त्या दिवशी खंडेरायाचे मंदिर रात्रभर सुरू असते.

यंदाही संगम झालाच नाही. जेजुरी भंडाऱ्याने पिवळी झाली नाही. ना कोणी खंडेरायाला आळविले. ना कोणी त्यांच्या दर्शनाला गेले. आज खंडेरायाला भंडाऱ्याबरोबर कपाळी अबीरही हवा असतो. पण, कोरोनामुळे त्यांना मंदिर बंद करून बसावे लागले आहे. साऱ्याच देवांनी आपली कवाडे बंद केली आहेत, आपल्या भाविकांच्या काळजीपोटीच. सध्या कोरोना विषाणू जगापुढे प्रभावी ठरत आहे. पंढरीची पायी वारी यंदा रद्द करावी लागली आहे. खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द झाली. दरवर्षी खंडेराया रात्रभर सुरू असलेल्या हरिजागरात तल्लीन होऊन जातो. तोही वारकऱ्यांसमवेत जागर करतो. आज गडाखाली हरिजागर नाही. पण, तरीही खंडेराया झोपणार नाही. त्या माऊलींच्या विरहात, त्या हरिगजराच्या आठवणीने. त्यांना आज गडावरून ना दिसते वारी, ना माऊलींची पालखी. माऊली आणि त्यांच्या सात्त्विक वृत्तीच्या वैष्णवांची पायी वारी चुकविणाऱ्या कोरोना राक्षसाचा वध करण्यासाठी मार्तंडेयांनी आता गड सोडावाच, अगदी अशीच प्रार्थना घरांमध्ये बसलेले लाखो वारकरी आज करीत असतील.

सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी जेजुरीत आली नाही. आज पालखी जुजेरीत असते. मात्र, कोरोनामुळे वारी रद्द झाली. त्यामुळे मल्हारनगरी सुनीनुनी आहे. दरवर्षी माऊलींच्या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविक जेजुरीत येतात. वारीमुळे आध्यात्मिक आनंदाबरोबर जेजुरीत मोठ्या प्रमाणात व्यवसाय होत असतो. वारीच नसल्याने सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर कोरोनामय वातावरण जाऊन पुन्हा पायी वारी सुरू व्हावी, ही प्रार्थना.

- गणेश आबनावे, जेजुरी

loading image