esakal | मनाचिये वारी : संत-वैष्णवांचा चैतन्यसोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal Rukmini

मनाचिये वारी : संत-वैष्णवांचा चैतन्यसोहळा

sakal_logo
By
शंकर टेमघरे

लोणंदमध्ये माऊलींचा पालखी सोहळा आला, की वारकऱ्यांमध्ये चैतन्य असते. कारण पालखी सोहळ्याचा चैतन्याचा स्रोत म्हणजे माऊलींचे रिंगण. सोहळ्यातील पहिले रिंगण चांदोबाच्या लिंबाजवळ असल्याने वारकऱ्यांमध्ये सकाळपासूनच चैतन्य असते. त्याच चैतन्यात पावले रिंगणाच्या दिशेने चालू लागतात. तेव्हा लक्षात येते, येथे सकाळपासूनच पुढे लोक चालत आलेले असतात. काही झाडाझुडपांच्या सावलीला विश्रांती घेतात, तर काही मोठ्या झाडाखाली रंगलेल्या भारुडात तल्लीन झालेले आहेत. दिंडीतील वारकरी सोडले, तर अन्य लोक रिंगण पाहण्यासाठी पुढे येऊन थांबतात. तसेच, येथील पंचक्रोशीतील भाविक रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी पोराबाळांना घेऊन येथे येतात. भक्तीयात्रेत रमून जातात. कपाळाला गंध लावून, पोराबाळांना घेऊन बैलगाड्यांतून आलेले अनेक शेतकरी चांदोबाच्या लिंबाजवळ दुपारी बारापासूनच थांबलेले असतात. काहीजण जेवण घेऊन येतात. या भक्तिमय वातावरणात जेवायचे. दुपारनंतर रिंगण पाहायचे आणि दिवस मावळतीला आला, की घरी निघून जायचे.

हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनेकांचा नित्यनियमच होऊन गेला आहे. दिंड्या चांदोबाच्या लिंबाजवळ येऊ लागतात. दोन्ही बाजूने भाविकांची तुडूंब गर्दी झालेली असते. सर्वांना आस असते ती माऊलींची. माऊलींचा रथ चांदोबाच्या लिंबाजवळ येतो. अंदाज घेऊन चोपदार रिंगण लावायला सुरुवात करतात. सोहळ्याला चांदोबाच्या लिंबाच्या जवळपास रथ आला, की रथाच्या पुढे २७ दिंड्या आणि रथामागे वीस दिंड्यांपर्यंत रिंगण लावले जाते. त्यानंतर प्रथम स्वाराचा अश्‍वमधून धावत रथाच्या दिशेने येतो. त्यामागे माऊलींचा अश्‍व धावत असतो. मात्र, धावताना त्यांच्यात जणू स्पर्धा लागलेली असते. रथाच्या उजव्या बाजूने अश्‍व रथाच्या मागे वीस दिंड्यांपर्यंत जातात. तेथून पुन्हा रथाजवळ येतात. तेथे माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतात. त्यावेळी देवस्थानचे विश्‍वस्त त्यांना हार आणि प्रसाद देतात. त्यानंतर रथाच्या पुढील २७ दिंड्यांमध्ये दोन्ही अश्‍व दौडत पुढे जातात. त्यावेळी अश्‍वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी झुंबड उडते. माऊली आपल्यात खेळली, या भावनेने वारकऱ्यांच्या चैतन्याला उधाण आलेले असते.

हेही वाचा: Corona Update: राज्याचा मृत्युदर 2.04 % वर; आज 8,296 नवे रुग्ण

आज प्रत्येक वारकऱ्याच्या मनात हूरहूर असणार. वारी नसल्याने रिंगणही नाही. चांदोबाच्या लिंबाच्या परिसरात दरवर्षीचे चैतन्य नव्हते. भक्तीचा जागर नव्हता. या परिसराला या दिवशी असलेले दरवर्षीचे ऐश्‍वर्य नव्हते. माऊलींच्या सोबतीला असणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा भक्तिभाव हेच त्यांचे ऐश्वर्य असते. संत आणि भक्तांचा अखंड सहवास हीच चैतन्यदायी आनंदाची अनुभूती असते. आजच्या वाटचालीत ती प्रकर्षाने जाणवते. आठवणी आणि प्रत्यक्ष अनुभूती यांच्यात अंतर असते, हे आज घरात बसलेल्या वारकऱ्यांना निश्‍चित जाणवत असेल. माऊलीसोबत जसे वारकरी नव्हते, तसा तो लिंबावरचा चांदोबाही नसणार, हेही निश्चित.

भेटी लागी जिवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी’, अशी वारकऱ्यांची विठ्ठलाप्रती भावना असते. आम्हा तरडगावकरांची माऊलींची पालखी गावात येण्यासाठी हीच भावना झाली आहे. आज माहेरवाशिणी आल्या आहेत. पण, माऊलींचा सोहळा नाही. त्यामुळे हूरहूर लागून राहिली आहे.

- नाना महाराज गायकवाड, तरडगाव

loading image