esakal | मनाचिये वारी : जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती..!
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal Rukmini

मनाचिये वारी : जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती..!

sakal_logo
By
शंकर टेमघरे

फलटण ते बरडची वाटचाल निसर्गाच्या सानिध्यात जाते. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर तृप्त मनाने वारकरी वाटचाल करीत असतात. बरड तसे छोटेसे गाव. येथील तळ कपबशीच्या आकाराचा भासतो. काही वर्षांपूर्वी सोहळा बरडमध्ये असताना जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे सर्वत्र चिखल झाला होता. वारकऱ्यांचे तंबू लावायलाही जागा नव्हती. तेव्हा वारकऱ्यांनी प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. इतकेच नाही, तर सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार नाही, अशा इशारा दिंडी संघटनेने दिला होता. (Shankar Temghare Writes about Aashadhi Wari)

प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी तळावर पोचले. तेव्हा परिस्थिती अवघड असल्याचे आढळले. त्यांनी तात्पुरती व्यवस्था केली. मात्र, वारकऱ्यांनी निर्धार कायम ठेवला. शेवटी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांना वारकऱ्यांनी गुडगाभर पाण्यातून तळावर आणले. तेथे बैठक घेतली. तेव्हा सरकारच्या वतीने पुढील सर्व तळांवर योग्य व्यवस्था करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी वारकऱ्यांना दिले होते. त्यानंतर वारकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. पण सध्याची तळांची स्थिती वाईटच आहे. काही अपवाद वगळता सर्वच तळांचा प्रश्‍न कायम आहे.

कोरोनामुळे गतवर्षी वारी रद्द झाली. यंदाही तीच स्थिती. मात्र, वारकऱ्यांनी आदेशाचे पालन केले. येथेच वारकरी संप्रदायाची संयमी आणि विवेक जागा ठेवून जगण्याची वृत्ती अधोरेखित होते. कोरोना हा संसर्गजन्य रोग नसता तर वारकरी घरी थांबलेच नसते. ‘काय होईल, माझा जीव जाईल ना? जाऊ दे, या मार्गावर देह सोडणे, या इतके मोठे पुण्यकर्म नाही,’ अशी भावना जगणारे वारकरी आहेत. पण हा वैयक्तिक आजार नाही, तर संसर्गजन्य आहे. त्यामुळे वारकऱ्यांची पावले थांबली. ‘जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती। देह कष्टविती, परोपकारे।।...’ हा वारकऱ्यांचा आचारधर्म आहे. त्यामुळे आपला त्रास दुसऱ्याला होऊ नये, यासाठी लाखो वारकरी घरी बसले. याला सरकारच्या आदेशापेक्षा वारकऱ्यांमधील परोपकारी वृत्ती अधिक प्रभावी ठरली.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारी रद्द होत आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गावात येणारे चैतन्य हरपले आहे. आम्ही वारकरी वारी यायच्या आधी महिनाभर वारकऱ्यांच्या सेवेची तयारी करीत असतो. मात्र, या सेवेला आम्ही मुकलो आहोत. सध्याची महामारी घालवून पुन्हा चैतन्यवारी घडवून आणावी, हीच विठुराया चरणी प्रार्थना.

- शेखर काशीद, सदस्य, ग्रामपंचायत बरड

loading image