esakal | मनाचिये वारी : आहे पंढरी विसावा...
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal Rukmini

मनाचिये वारी : आहे पंढरी विसावा...

sakal_logo
By
शंकर टेमघरे

सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला की वारीच्या वाटेने दररोज रिंगणाचा आनंद मिळतो. कधी सकाळी, तर कधी सायंकाळी रिंगणाच्या रूपाने माउलींची पूजा बांधली जाते. प्रत्येक रिंगणाला गर्दी असतेच. वारीतील तो आध्यात्मिक आविष्कार साऱ्यांनाच अनुभवायचा असतो. तसाच आनंद सकाळच्या प्रहरी खुडूसमध्येही असतो. सर्व गोल, रिंगणाची प्रक्रिया परंपरेप्रमाणे तीच असली, तरी प्रत्येक वेळी त्याचा शेवट होतो ते आनंदानेच! त्यामध्ये बदल असतो तो माउलींचा अश्‍व रिंगणात किती फेऱ्या मारतो याचाच. रिंगण पाहताना निर्माण होणाऱ्या परमानंदाच्या लहरीत सोहळा रंगतो.

पिलीवच्या माळरानावर अवघा सोहळा वनभोजनाचा आनंद घेतो. परिसरातील भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. तेथून वेळापूरजवळ असतो तो ‘धावा’. तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा, असा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. असे म्हटले जाते की, येथे आल्यानंतर तुकोबारायांना पंढरी दिसल्याने ते उतारावरून धावत सुटले. तेव्हा हा अभंग म्हटला, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे आजही येथून एकेका दिंडीला हा अभंग म्हणत चोपदार उतारावरून खाली सोडतात. तुकोबारायांच्या विचारांचे मनोभावे आचरण करीत वारकरी धावत सुटतात. मग तो लहान असो, ज्येष्ठ, अश्‍व असो रथाचे बैल, सारे धावतात त्या पंढरीकडे. आता पंढरी आली, अशीच वारकऱ्यांची भावना होत असल्याने सारा आनंदीआनंद असतो. धावा संपताच शेडगे दिंडी नंबर तीनच्या वतीने माउलींच्या पालखीसमोर भारुड रंगते. भारुडातील लोकरंगात वेळापूरचा माळ न्हाऊन निघतो.

हेही वाचा: 'आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांचा नोकरीचा प्रश्‍न मार्गी लागेल'

वारी नसल्याने रिंगण, धावा, भारुडातून मिळणाऱ्या आनंदाच्या पर्वणीला लाखो वारकरी मुकले. वारीत नित्यनवा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामध्ये निखळ परमानंद असतो. वारकऱ्यांना तो मिळत नसल्याने दुःख होणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीची पूर्ण जाण असल्याने वारकरी घरूनच मनवारी करीत आहे. आज खुडुस असो वा वेळापूर सारे उजाड असणार. सोहळ्याअभावी तेथील चैतन्य हरपले आहे. वारकरी संवेदनांवर नियंत्रण ठेऊन घरी आहे. मात्र, त्याच्या प्रेमात विरहाचे स्वरूप आहे. प्रेमात विरहाला सर्वोत्तम स्थान आहे. त्यामुळे विरहातून वारकरी अखंड वारीच्या वाटेवर असणार यात शंका नाही. वारकरी पंढरी समीप आल्याच्या भावनेने आज वारीत धावले असते. पण, पंढरीची ओढ शरीराने नसेल. परंतु, चार पावले तरी आज वारकरी घरात धावतील आणि निश्चित त्या पंढरीच्या पांडुरंगाचा धावा करतील, बा पांडुरंगा बस्स, अशी वारी नको. वारीसोबतचा आनंदाची तुलना कोणत्याही मनाच्या वारीला असू शकत नाही, हे तितकेच खरे आहे.

माउलींचा सोहळा वेळापुरात नसल्याचे दुःख शब्दात सांगता येत नाही. दरवर्षी माउलींसोबत येणारे ऐश्‍वर्य यंदा आले नाही. मात्र, आम्ही वेळापूरकरांनी धाव्यापासून तळापर्यंत दिंडी काढली. भारुडाचा कार्यक्रम केला तसेच, तळावर माउलींचे पूजन केले. पुढील वर्षी माउली निश्चित सारे काही ठीक करून वारीद्वारे पंढरीला जातील, याबद्दल आमची पूर्ण श्रद्धा आहे.

- अमोल महाराज टिंगरे, वेळापूर

loading image