esakal | मनाचिये वारी : भावभक्तिचा सोहळा
sakal

बोलून बातमी शोधा

Vittal Rukmini

मनाचिये वारी : भावभक्तिचा सोहळा

sakal_logo
By
शंकर टेमघरे

वेळापूरकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळा सकाळी ठाकुरबुवाच्या समाधीजवळ रिंगणासाठी थांबतो. तेथील शेतात माऊलींचे रिंगण रंगते. ठाकुरबुवा हे माउलीभक्त. त्यांचे येथे समाधी मंदिर आहे. त्यामुळे येथे रिंगणाचा सोहळा होतो. अनेकदा येथील शेतकरी रिंगणासाठी आपल्या शेतात काही लागवड करीत नाही. रिंगणासाठी शेत मोकळे ठेवतात. सोहळा पुढे निघून गेल्यानंतर तेथे पिकांचे नियोजन केले जाते. तोंडले बोंडलेमध्ये दुपारचा विसावा असतो.

तोंडले बोंडले येथे अनेक संतांच्या पालखी सोहळे एका मार्गावर येतात. बोरगावमार्गे तुकोबारांयाचा सोहळा या मार्गावर येतो. तर सोपानदेव महाराजांचा सोहळाही तोंडल्याजवळ विसावा असतो. या वाटचालीत सोहळा पंढरपूर तालुक्यात प्रवेश करतो. दुपारचा विसावा घेऊन सोहळा भंडीशेगावच्या दिशेने मार्गस्थ होतात. पंढरपूर तालुक्यात प्रवेश करताना माउली-सोपानदेव भेटीचा सोहळा असतो. हा सोहळा पाहण्यासाठी वारकरी आणि परिसरातील गावातील भाविक टप्प्यावर गर्दी करतात.

हेही वाचा: मनाचिये वारी : आहे पंढरी विसावा...

माउलींचा पालखी सोहळा टप्प्याजवळ थांबतो. त्यापाठोपाठ सोपानदेवांचा पालखी सोहळा तेथे येतो. दोन्ही रथ शेजारी-शेजारी उभे केले जातात. दोन्ही सोहळ्यातील मानकरी एकमेकांना भेटतात. दोन्हीकडून मानाचे नारळप्रसाद दिला जातो. बंधूभेटीचा हा सोहळा पाहताना उपस्थितांचे डोळे पाणावतात. हा भावनिक सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थित होतो आणि सोपानदेवांचा रथ पुढे मार्गस्थ होतो. त्यावेळी दोन्ही संतांच्या दर्शनासाठी उपस्थितीतांची झुंबड उडते.

आळंदी ते पंढरपूर या वाटचालीत अनेक आनंदाचे सोहळे होतात. त्यात उभी, गोल रिंगणे, धावा, भारुडे यांचा समावेश असतो. मात्र, बंधूभेटीचा सोहळा भावनिक होतो. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वी या भावंडांना झालेल्या कष्टमय यातनांच्या स्मरणानेच भाविकांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात. दोन्ही रथ शेजारी उभे केल्यानंतर पुडलिकवरदा हरी विठ्ठल असा जयघोष होतो. तेव्हा अवघा सोहळा सद्गदित होतो. तेव्हा या भावंडांवर वारकऱ्यांची अतूट श्रद्धा अधोरेखित होते. आजही संतांच्या विचारांवर लाखो वारकऱ्यांचा विश्‍वास आहे. वारी हा त्याचाच एक आविष्कार आहे. गेल्या दोन वर्षांपासून वारी होत नाही; पण मनाच्या घरोघरी मनाची वारी सुरू आहे. जसजशी आषाढी एकादशी जवळ येऊ लागली आहे, वारकऱ्यांमधील हुरहूर वाढू लागली आहे. मात्र, मनवारीशिवाय सुयोग्य असा कोणताही उपाय यंदा तरी दिसत नाही.

गेल्या दोन वर्षांपासून वारी येत नाही. दरवर्षी वारीच्या निमित्ताने आमच्या गावातील अनेक संतांचा सहवास लाभतो. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळते. मात्र, आज गावात नैराश्याचे वातावरण होते. आम्ही माउलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी पूजन केले. मात्र, कोरोना जाऊन पुन्हा माउलींच्या रूपाने नवचैतन्य प्राप्त होवो, ही प्रार्थना.

- संजय रणखांबे, माजी उपसरपंच, भंडीशेगाव

loading image